देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका; भातखळकरांची ठाकरे सरकारवर टीका
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप कायम असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, दररोजची रुग्णसंख्या कमी झाल्याने अनलॉकच्या माध्यमातून बहुतांश गोष्टी पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, मंदिरे न उघडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने मनसे, भाजपसह अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने राज्यभर आंदोलने करुन आपला विरोध दर्शवला, तर राज ठाकरे यांनी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यातच आता देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका, अशी घणाघाती टीका भाजपने केली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सर्वसामान्यांसाठी नियमानुसार बंद असलेल्या मंदिरात मात्र व्हीआयपी व्यक्ती जाऊन दर्शन घेत असल्याची बाब एका व्हिडिओतून समोर आली आहे. यावरून अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळ यांनी सिद्धिविनायकाचे मागील दाराने दर्शन घेतले. मग सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका आणि मंदिरे कडीकुलुपात ठेवून जनतेचाही अंत पाहू नका, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दुसरीकडे, हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचे पत्र दाखवायचे आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, दहीहंडी आणि गणेशोत्सव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण कोरोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी करोनाविरुद्ध आंदोलन करा, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरूनही भातखळकर यांनी टोला लगावला आहे.
आम्ही हिंदूंच्या सणांविरुद्ध नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्याना करावा लागला, यातच सर्व आले. जनता पाहतेय की ठाकरे सरकारने आधी दारूची दुकाने उघडली, मंदिरे अजून बंद आहेत. राज्यातले सत्ताधारी मात्र चोरून मंदिरात दर्शन घेतात. मोहरमला सशर्त परवानगी मिळते आणि दहीहंडीवर सरसकट बंदी येते, अशी टीका भातखळकर यांनी दुसऱ्या एका ट्विटमधून केली आहे.
'आम्ही हिंदूंच्या सणांविरुद्ध नाही', असा खुलासा मुख्यमंत्र्याना करावा लागला, यातच सर्व आलं.
जनता पाहतेय की ठाकरे सरकारने आधी दारूची दुकाने उघडली, मंदिरे अजून बंद आहेत. राज्यातले सत्ताधारी मात्र चोरून मंदिरात दर्शन घेतात. मोहरमला सशर्त परवानगी मिळते आणि दहीहंडीवर सरसकट बंदी येते.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 31, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेना खासदारच जुमानत नाहीत. काल भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर आंदोलन केले तर कारवाई केली. आता थेट मंदिरात आत जाऊन दर्शन घेणाऱ्या खासदार राहुल शेवाळे यांच्यावर कारवाईची धमक दाखवणार का, असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.