मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भाजप नेते अतुल भातखळकर, दिल्लीचे मुख्यमंत्री, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे.
भाजपचे आक्रमक नेते अतुल भातखळकर यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत असून आता आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती भातखळकर यांनी दिली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशामध्ये मुंबईतील लग्न सोहळ्यांना आणि बैठकांना नेते मंडळी उपस्थिती लावत आहे. यामुळे नेत्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकरही मुंबईत बैठका आणि लग्न सोहळ्यांना उपस्थित राहिले होते. तसेच अधिवेशनादरम्यान अनेकांच्या संपर्कातही आले होते. अधिवेशनानंतर आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः ट्वीट करुन दिली आहे. भातखळकर म्हणाले की, माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी. असे आवाहनही अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर मुंबईतील निवासस्थानी उपचार करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण झाली असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यांच्यासह त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु असून काळजी घेण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही पंकजा मुंडेंनी केले आहे. यापू्र्वी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर खासदार सुजय विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोठ्या संख्येने राज्यातील नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी संपर्कात येणाऱ्या लोकांना स्वतःला विलगीकरण आणि चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात राहावे आणि स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. अशावेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका मागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार आणि काँग्रेस आ. धीरज देशमुख या दोघांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढल्यानंतर त्यांनी चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे.