मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज (मंगळवार) सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार होती. त्यासाठी सकाळी ११ वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देखील बजाविण्यात आले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे.
अनिल देशमुखांनी वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. देशमुख यांच्या या भूमिकेनंतर ईडीने पुन्हा त्यांना निरोप धाडला आहे. चौकशीसाठी कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करणार, असं ईडीने म्हटलं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख नक्की कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.
देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी ईडीने शुक्रवारी छापे टाकले हाेते. देशमुख यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास बोलाविले होते. मात्र, त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, हे प्रथम कळवावे, अशी मागणी वकिलांमार्फत करीत देशमुख यांनी चाैकशीला जाण्याचे टाळले.
ईडीने त्याचदिवशी पुन्हा नव्याने समन्स बजाविताना मुंबईतून झालेल्या हप्तावसुलीबाबत चौकशी करायची असल्याचे नमूद करीत २९ जूनला ११ वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले. त्यामुळे अत्यावश्यक कारण उद्भवल्याशिवाय देशमुख यांना चाैकशीला जाणे टाळता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.