मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणात मालवणी पोलिसांकडून नारायण राणे आणि आ. नितेश राणे यांची आज मालवणी पोलिसांकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. जबाब नोंदवल्यानंतर नारायण राणे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्यानंतर माझा जबाब नोंदवला गेला आणि मग आम्हाला सोडण्यात आल्याचं राणेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ‘मला दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातून एक नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात यावं अशी ती नोटीस होती. त्यात दिशा सालियानच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगायला बोलावण्यात आलं आहे. दिशाबाबत जे काही मी आणि नितेश पत्रकार परिषदेत बोललो होतो. तिचे खरे आरोपी पकडले पाहिजेत. तिने आत्महत्या केली नसून ती हत्या आहे, असं मी वारंवार बोलत होतो. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दिशाच्या आईकडे गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आईला खोटी तक्रार करायला लावली’, असा गंभीर आरोप राणेंनी केलाय.
राणे म्हणाले की, मला ९ तास बसवून घेतलं. मी सांगतोय मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे. आम्हाला अधिकार आहे कुणावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून द्यावा. आम्ही दिशाला न्याय देण्याची मागणी करत आहोत. आम्ही अटकपूर्व जामीन घेतला. शेवटी मी अमित शहांना फोन केला. त्यानंतर माझा आणि नितेशचा जबाब घेतला आणि त्यानंतर आम्हाला सोडलं, असंही राणेंनी माध्यमाशी बोलताना सांगितलं.
मुख्यमंत्री ठाकरेंनी मला दोन वेळा फोन केला आणि म्हणाले…
सुशांतची हत्या झाल्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा दोनवेळा फोन आला की तुम्ही याबाबत बोलू नये. असे सांगितले. मात्र पोलिसांनी माझं हे वाक्य जबाबातून वगळलं. मात्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहणार. आम्ही आवाज उठवणार. दिशा सालियची केस बंद केली जात आहे. ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना सरकार संरक्षण देत आहे. मी शरद पवारांचे वक्तव्य ऐकले. वाह पवारसाहेब, काय बोलावं की कीव करावी हेच कळेना. आमची कुणा दाऊदसोबत दोस्ती नाही, तो देशद्रोही आहे. त्याच्याशी मलिकांचे संबंध, म्हणून आम्ही राजीनामा मागतोय. तुम्ही आमचे राजीनामे मागता. तुम्ही हेच केलं आयुष्यभर, हीच तुमची पुण्याई आहे. आमचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही, असे राणे म्हणाले.
राणे समर्थकांना पिटाळले
नारायण राणे आणि नितेश राणे दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील सतीश मानेशिंदे देखील पोलीस ठाण्यात गेले होते. राणे समर्थकांनी पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती. त्यावेळी राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी राणे समर्थक कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. यावेळी, नारायण राणेंच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून सोडला.
राणे-पिता पुत्राबाबत न बोलता फडणवीस का निघून गेले?
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि भाजप आ. नितेश राणे यांना मालवणी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागली आहे. याबाबत नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. फडणवीस यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, राणेंबाबतचा सवाल विचारताच फडणवीस यांनी काहीही भाष्य न करता निघून गेले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.