विरार : विरार पूर्वेकडील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास लुटण्याचा प्रकार घडला आहे. लुटीचा प्रकार होताना विरोध केल्याने बँकेच्या शाखेच्या महिला मॅनेजरची चाकूने हत्या केली तर कॅशिअर महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी पोहचले. एका चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर दुसरा आरोपी पळून गेला आहे.
विरार पूर्वेकडे आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. आरोपी हा पूर्वी याच शाखेत मॅनेजर होता व त्याच्यावर एक कोटींचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी हा डाव आखल्याचे सूत्रांकडून कळते. याने येण्याच्या आधी या ठिकाणी असलेल्या महिला मॅनेजरला फोन करून विचारपूस केल्याचेही कळते.
संध्याकाळच्या वेळेला कमी कर्मचारी वर्ग असल्याने हा डाव आखला असल्याचे बोलले जात आहे. त्याने पावणेआठच्या सुमारास शाखेत घुसून महिला मॅनेजर योगिता चौधरी, कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्या गळ्यावर चाकू ठेवून लॉकरमधील सोने काढून चोरी करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मॅनेजर चौधरी यांनी विरोध केल्यावर चाकूने त्यांची हत्या केली तर कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्यावर हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहे. एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.