राजकारण

मनसुख हिरण यांच्या कुटुंबियांची एटीएसकडून चौकशी; बँक व्यवहार देखील तपासणार

मुंबई : प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज एटीएसने ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मुख्य म्हणजे मनसुख हिरण यांच्या बँक अकाउंट्सचे डिटेल्स त्यांनी मिळवले. आणि थेट कुटुंबियांना चौकशीला बोलवले. त्यामुळे एटीएस लवकरच तपासाची दिशा ठरविण्यात यशस्वी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

एटीएसकडे तपास गेल्यानंतर आता चार दिवस उलटले आहेत. मनसुख हिरण यांच्या केसचा कागदी अभ्यास केल्यानंतर आता एटीएसची टीम फिल्डवर जाऊन तपास करत आहे. त्यातूनच आज एटीएसच्या टीमने ठाण्यातील अनेक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. यातून त्यांनी महत्वाची कागदपत्रे आणि महत्वाची माहिती संकलित केली.

ठाणे एटीएस टीमने ठाण्यातील चार ठिकाणी जाऊन चौकशी केली. यामध्ये 2 खासगी बँकांचा देखील समावेश होता. एटीएस टीमने या बँक शाखांमध्ये जाऊन काही कागदपत्र गोळा केली. असा अंदाज आहे की एटीएसची टीम मनसुख यांच्या बँक अकाउंटची तपासणी करून त्यांचे कोणासोबत आर्थिक व्यवहार होते का ते तपासात आहे. याच वेळी एटीएसची दुसरी टीम मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. कारण मनसुख यांची डेड बॉडी ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सापडली होती ते पोलीस स्टेशन म्हणजे मुंब्रा पोलीस स्टेशन होते. याच पोलीस स्टेशनने त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करून त्यांचा मृतदेह कळवा येथील पालिका हॉस्पिटलमध्ये पाठवला होता. इतकेच नव्हे तर शवविच्छेदन अहवाल देखील याच पोलीस स्टेशनला देण्यात आला होता.

मनसुख हिरण यांच्या शवविच्छेदनाच्या वेळी सचिन वाझे अचानक त्या ठिकाणी आले होते. त्यांनी डॉक्टरांशी दहा ते पंधरा मिनिटे चर्चा केली होती. त्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर न देता ते त्या ठिकाणाहून परतले होते. विधानसभेत देखील अशिष शेलार यांनी सचिन वाझे यांच्या भेटी वरून संशय उपस्थित केला होता.

या दोन्ही टीम एका बाजूला तपास करत असतानाच दुसऱ्या बाजूला एटीएस ची तिसरी टीम मनसुख यांच्या घरी पोचली. त्यांनी मनसुख यांच्या दोन मुलांना आणि पत्नीला स्वतःसोबत वागळे इस्टेट येथील एटीएसच्या कार्यालयात चौकशीसाठी आणले. मनसुख यांच्या पत्नीच्या तक्रारीमध्ये दिलेल्या सर्व गोष्टी एटीएस आता क्रॉस व्हेरिफाय करते आहे. यातून वेगवेगळ्या दिशेने तपास करून मनसुख हिरण यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. अजूनही मनसुख यांची आत्महत्या की हत्या या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने. एटीएस करत असलेला तपास महत्वाचा ठरणार आहे.

मनसुख हिरण यांच्या मृत्यू सारख्या मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एटीएस प्रसिद्ध आहे. मात्र अजूनही एटीएसच्या हातात हवे तसे पुरावे आणि माहिती मिळाली नसल्याचे समजते आहे. मनसुख यांच्या मोबाईल चे लोकेशन वसई येथे कसे मिळाले? त्यांचे आणि सचिन वाजे यांचे नेमके काय संबंध होते? त्यांच्या तोंडावर इतके रुमाल का बांधण्यात आले होते ? आणि महत्वाचे म्हणजे मनसुख यांची हत्या आहे की आत्महत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे एटीएस ला अजून सापडलेली नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button