राजकारण

आसाम विधानसभा निवडणूक : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे उमेदवार निवडणार

नवी दिल्ली : राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यांतर पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी झाले की काय अशी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत आसाम निवडणुकीसाठी त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

निवडणूक आयोगाने नुकतंच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक तारखांची घोषणा केली. यामध्ये आसामचाही समावेश आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवार निवडणुकीसाठीची समिती अर्थात स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल आणि दीपिका पांडे सिंह या समितीच्या सदस्या असतील.

आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल. दरम्यान, मागील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलेलं असल्याने आसाममध्ये पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन आणण्याचं मोठं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर असणार आहे. हे आव्हान ते कसं पेलतात यावरच काँग्रेस पक्षाची मदार असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button