आसामचा मुख्यमंत्री आज दिल्लीत ठरणार!
नवी दिल्ली: आसामच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी आज (शनिवार) दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्यातील पक्षाचे बडे नेते हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत पाचारण केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपने आसाममध्ये पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, हिंमत बिस्वा सरमा हे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने भाजपला आसामचा मुख्यमंत्री ठरविता आला नाही. त्यामुळे थेट नड्डा यांनीच दिल्लीत आसामच्या या दोन्ही बड्या नेत्यांना दिल्लीत पाचारण केलं आहे. आज सकाळी १०.३० वाजता हे दोन्ही नेते नड्डा यांना भेटणार असून त्यात राज्यातील नेतृत्वाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आसाममध्ये सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आज संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा या दोन्हीपैकी एकाचेही नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा हा तिढा सुटू शकतो, असं सांगितलं जात आहे.
हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, २०१६ च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपने सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. बिस्वा सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून भाजप त्यातून मार्ग कसा काढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.