पाच राज्यातील काँग्रेसच्या पराभवांबाबतचा अहवाल सोनियांना सादर

नवी दिल्लीः महाष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींकडे मंगळवारी एक अहवाल सादर केला. एप्रिल-मे महिन्यात ५ राज्यांत विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. इतका की पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सोनिया गांधींकडे सोपवला आहे.
सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांचा छडा लावण्यासाठी गेल्या ११ मे रोजी ही समिती नेमली होती. या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. नंतर आणखी एक आठवडा वाढवून देण्यात आला. या समितीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनीष तिवारी, विन्सेंट पाला आणि लोकसभेतील पक्षाचे खासदार ज्योती मणी यांचा समावेश होता. या समितीच्या नेमणुकीनंतर समितीच्या सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतील नेत्यांसोबत बैठक घेतली.
समितीने संबंधीत राज्यांचे प्रभारी आणि प्रदेश संघटनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांच्यासोबत चर्चा करून प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि कारणांची माहिती घेतली. ५ विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पराभवाच्या कारणांची समीक्षा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याला प्रस्तावाला काँग्रेस कार्यकारिणीने मंजुरी दिली होती. आसाम आणि केरळमध्ये सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. पुदुच्चेरीतही पक्षाचा सपाटून पराभव झाला. तामिळनाडुतील निकालाने काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला. द्रविड मुन्नेत्र कळघमसोबत (डीएमके) केलेल्या आघाडीचा विजय झाला. डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन हे मुख्यमंत्री झाले.