मुंबई : नुकतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेस नेतृत्वावर जहरी टीका केली. ममतांची टीका अनेक काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ममतांवर एका व्हिडिओद्वारे टीका केली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओद्वारे त्यांनी ममतांवर अप्रत्यक्ष टोला लगावलाय. व्हिडिओत विलासराव देशमुख म्हणतात, “काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.” या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये अशोक चव्हाण लिहीतात, ‘अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली.’
Congress has the biggest and the most precious treasure of democratic values and an all-inclusive progress with it. There is no need to fear. Over all these times, We have always walked straight with our inclusiveness being our biggest strength.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 2, 2021
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी ?
मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली आणि काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्यावर भर दिला. यूपीए आता आहे कुठे? यूपीए आता नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत बुधवारी दिले.
परदेशात राहून राजकारण अशक्य
यावेळी ममतांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला लगावला. तसेच, तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का लढत आहात, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने विचारला. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डावे पक्ष आमच्याविरोधात बंगालमध्ये लढले. त्यामुळे आता आम्हीही काँग्रेसविरोधात कंबर कसली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यावाच लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.