Top Newsराजकारण

ममता बॅनर्जींना अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेसला वगळून भाजपविरोधात तिसरा सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्नात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या टीकेला आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या ‘फोडा आणि झोडा’च्या प्रयोगाला बळ देऊ नका : चव्हाण

लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलाय.

काँग्रेस हाच लोकशाहीसाठी सक्षम पर्याय : थोरात

भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर या दरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुलजी गांधी मागे हटले नाहीत. देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात, असा सवालही थोरात यांनी केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button