आर्यन खानचा कोठडीतील मुक्काम वाढला; आता बुधवारी सुनावणी
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन कोर्टाने पुन्हा फेटाळला. त्यामुळे आर्यनचा मुक्काम आणखी दोन दिवस म्हणजेच बुधवार १३ ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्येच असेल. आर्यन खानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी जामिनावर बुधवारी सुनावणी घेण्याची मागणी केली. विशेष कोर्टात आर्यनच्या जामिनावर बुधवारी दुपारी २.४५ वाजता सुनावणी होईल.
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंतची मुदत दिली. क्रूझ ड्रग्ज छापेमारी प्रकरणी बोलताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, आम्ही आणि फिर्यादी प्रयत्न करू की प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल.
ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला ४ ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने ७ ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती. त्यानंतर आठ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने १४ दिवसांची कोठडी आरोपींना सुनावली.
आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे ६ ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे ५ ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं होतं.