पंजाब काँग्रेसमधील वाद संपुष्टात; सिद्धूंना मिळणार मोठे पद !

अमृतसर : पंजाब काँग्रेसमध्ये उठलेले राजकीय संकट शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हरीश रावत यांनी यावर मोठे संकेत दिले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामधील कलह दूर करण्याचा फॉर्म्युला शोधण्यात आला आहे. यानुसार कॅप्टन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत, तर नाराज सिद्धूंना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनविले जाणार आहे.
याचबरोबर दोन कार्यकारी अध्यक्ष देखील बनविले जाणार आहे. यापैकी एक हिंदू तर दुसरा दलित समाजाचा असणार आहे. याची अधिकृत घोषणादेखील लवकरच केली जाणार असल्याचे हरीश रावत यांनी सांगितले. सध्या पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़ आहेत. या दोघांच्या वादात जाखड यांचा बळी जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे.
पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. यामुळे हे नाराजीचे वादळ शमविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या कॅबिनेटमध्ये नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. पक्षात दोन अध्यक्ष बनविण्यामागे मताचे राजकारण असू शकते. पक्षात यावरून देखील मतभेद होते, की पक्षाचे नेतृत्व हिंदू नेत्याला की शीख नेत्याच्या हाती सोपविले जावे. यावरदेखील तोडगा काढण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पंजाबमधील गटबाजीमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी बैठक घेतली होती. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता होती. या बैठकीत राहुल गांधी, महासचिव केसी वेणुगोपाल, प्रियंका गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत होते. तीन-चार दिवसांत पंजाब काँग्रेससाठी चांगली बातमी मिळेल असे संकेत रावत यांनी दिले होते.