मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. दुसरीकडे मुंबई न्यायालयाच्या निकालाविरोधात आम्ही सत्र न्यायालकडे दाद मागू असे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे.
कोर्टाने आज आर्यन खानचा जामीन फेटाळून लावला आहे. मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, इस्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. काल एनसीबीने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एस्प्लेनेड कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर आज कोर्टात जोरदार खडाजंगी झाली.
न्यायालयाने या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र काल कोरोनाच्या कारणास्तव एक रात्र तुरुंगाऐवजी आर्यनसह इतर आरोपींना एनसीबी कार्यालयात काढावी लागली. आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आलं आहे. आर्यनसह इतर आरोपीना ३ ते ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये त्यांना ठेवण्यात येईल.
आर्यन खान आणि इतर दोघांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एनसीबीला ड्रग्ज प्रकरणात अधिक चौकशी करता येणार आहे. मात्र, या निकालाविरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. निकालाची प्रत मिळाल्यानंतर तातडीनं सत्र न्यायालयात जाणार असल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.
दोन्ही वकिलांमध्ये खडाजंगी
आर्यन खानसह त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर साथिदारंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खानची बाजू अॅड. सतीश मानेशिंदे यांनी मांडली तर एनसीबीतर्फे एएसजी सिंग यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद तब्बल अडीच तास चालला. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
युक्तिवादादरम्यान, मानेशिंदे यांनी आर्यन खानला जामीन मिळावा अशी कोर्टाकडे मागणी केली. त्यासाठी त्यांनी कोर्टाला एकूण २२ निकालांचा हवाला दिला. तसेच आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, असेदेखील ते म्हणाले. आरोपींना जामीन देण्याबाबत जे अधिकार हायकोर्ट आणि सेशन कोर्टला आहेत. तेच अधिकार महानगरीय कोर्टालाही आहेत. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, एक ग्रॅमदेखील ड्रग्ज सापडलेले नाही. म्हणून जामीन मिळावा. आर्यन खानकडे चॅटशी निगडित मटेरियल सापडलं आहे. तो जामिनास पात्र आहे. आरोपी जामिनावर असूनसुद्धा चौकशीला सहयोग करू सकतो. जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा चौकशीसाठी यायला तयार आहे, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला.
यावेळी जामिन मिळावा म्हणून मानेशिंदे यांनी आर्यनच्या वयाचा दाखला दिला. आर्यन फक्त २३ वर्षांचा आहे. त्याचा मोबाईल सध्या जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्याला पार्टीसाठी फक्त आमंत्रण देण्यात आलं होतं. त्याचा मोबाईल सध्या फॉरेन्सिककडे आहे. त्याचा एक परिवार आहे. त्याचे आई-वडील येथेच राहतात. त्यामुळे आर्यन देशाबाहेर जाण्याचा किंवा फरार होण्याचा प्रश्नच नाही, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला.
आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी एएसजी सिंग यांनी केली. या प्रकरणात अचित कुमार नंतर आम्ही एका नायजेरियनला अटक केली आहे. सर्वजण आरोपींना जामीन मिळावा असे सांगत आहेत. पण हा जामीन दिला जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. तसेच न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळावा यासाठी त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जाचा दाखला दिला. कायद्यानुसार दाखल केलेले सर्व गुन्हे हे अजामीनपात्र आहेत, असा दावा सिंग यांनी केला.