ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचे निधन
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये झाला होता.बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंगावर घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी यांची क्रेझ होती.
बप्पी लहरी हे अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बप्पी दा यांना कोरोनाची लागण झाली होती. ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया) मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बप्पी दा यांनी ७०-८० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. ८० आणि ९० च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करण्यात बप्पी दा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बप्पी दा यांना १९८५ मध्ये ‘शराबी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोनं, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत बप्पी लहरी यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोनं आणि ४.६२ किलो चांदी होती.
पंतप्रधांना शोक
बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्विट करून बप्पी दांना श्रद्धांजली वाहिली. ‘बप्पी लहरी जी यांचे संगीत सर्वसमावेशक आणि विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी ऐकायचे. त्यांचा मनमिळावू स्वभाव सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.’
अमित शहा यांनीही व्यक्त केला शोक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही बप्पी दा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, ‘प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी दा त्यांच्या अष्टपैलू गायनासाठी आणि जिवंत स्वभावासाठी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.’