मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या १८ दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे.
आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळले आहेत. या सुनावणी दरम्यान न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच युक्तीवाद पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी कोर्टात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला. आर्यन खानच्या वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आर्यन खानच्या वकिलांना निकालाची तपशीलवार प्रत मिळताच त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर केला आणि गुरूवारी म्हणजेच, आजच तातडीची सुनावणी घेण्याचा विनंती अर्जही सोबत दाखल करण्यात आला होता. आर्यन खानचे वकील, बचाव पक्षाचं म्हणणं आहे की, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळतो, परंतु या प्रकरणात असं झालं नाही. आर्यनच्या वकिलांसमोर ३० ॲाक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर १२ दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या ७ दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीपर्यंत जेलमध्येच रहावे लागेल.