चेन्नई : ‘कोलावरी डी’ या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याबद्दल धक्कादायक बातमी आली आहे. समान्था प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता धनुष याने पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. तब्बल १८ वर्षानंतर हे दोघेही वेगळे होत आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने अचानक पोस्ट करून ही घोषणा केल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
धनुषने ट्विटरवर पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. १८ वर्षाची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली आहे.
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याचा २००४ मध्ये विवाह झाला होता. त्यांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत. मध्यंतरीही हे दोघे विभक्त होण्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, या दोघांनीही मीडियाशी कधीच संवाद साधून या बातम्यांचं खंडन केलं नव्हतं. धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष मल्टिटॅलेंटेड आहे. धनुष अभिनेता तर आहेच. शिवाय दिग्दर्शक, निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.
काढल कोंडाईन या सिनेमाच्या दरम्यान धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. सिनेमाच्या निर्मात्याने ऐश्वर्याची धनुष सोबत ओळख करून दिली. ऐश्वर्याने या सिनेमातील कामाबद्दल धनुषचं कौतुक केलं होतं. ऐश्वर्याने कामाचं कौतुक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनुषने ऐश्वर्याला फुलांचा गुच्छ पाठवला. ऐश्वर्याला धनुषची ही भेट प्रचंड आवडली आणि त्यानंतर दोघं चांगले मित्रं बनले. दोघेही जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ते फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटत नसायचे. त्यामुळे दोघांचे फोटो वारंवार छापून यायचे. मीडियात दोघेही बातमीचा विषय बनून गेले होते. मात्र, आपल्या नातेसंबंधावर धनुषने कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. ऐश्वर्या आपल्या बहिणीची मैत्रीण आहे असंच ते सांगायचे. मात्र, कालांतराने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या लव्ह स्टोरीची अधिकृत माहिती समोर आली. १८ नोव्हेंबर २००४ रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अख्खी साऊथची फिल्म इंडस्ट्री हजर होती.
श्रुती हसनमुळे धनुषच्या संसारात वादळ?
धनुष आणि ऐश्वर्या विभक्त होण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र श्रुती हसन सोबतच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. अभिनेता धनुष आणि श्रृती हसन यांच्या अफेअरच्या चर्चा चित्रपट ‘३’ च्या शूटिंग दरम्यान होत्या. ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रृतीची लहानपणीची मैत्रीण ऐश्वर्याने केले होते. ऐश्वर्याने श्रृतीला आपला चित्रपट ‘३’ साठी कास्ट केले होते.
चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान धनुष आणि श्रुती ऐकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी धनुष आपल्या पत्नीसोबत पब्लिक इव्हेंटमध्ये देखील जात नसे. मात्र श्रुतीने या अफवांचे खंडण केले होते. या बातम्या खोट्या असून यामध्ये काही तथ्य नाही. धनुष माझा चांगला मित्र असून त्याने कायम माझी मदत केली आहे. त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा मी विचार करत नाह. तसेच ऐश्वर्याने देखील या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले होते.