मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?, मलाही अटक करा : राहुल गांधी
नवी दिल्ली: कोरोना लसीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात दिल्लीत पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे २५ लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांना जामीनही मिळाला आहे. मात्र, या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर हे पोस्टरच शेअर केलं आहे. त्यात या दोघांनी मलाही अटक करा, असं म्हटलं आहे. तसेच मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असं हिंदीत लिहिलेलं हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून नेटकरी हे पोस्टर व्हॉट्सअॅपवर डीपी म्हणून ठेवण्यास एकमेकांना सांगत आहेत.
Arrest me too.
मुझे भी गिरफ़्तार करो। pic.twitter.com/eZWp2NYysZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
दिल्लीत गुरुवारी रात्री पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यावर मोदीजी, आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली? असं लिहिलं होतं. दिल्ली पूर्व, नार्थ ईस्ट, सेंट्रल, नॉर्थ, रोहिणी आणि द्वारका जिल्ह्यात हे पोस्टर लावलेले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हे पोस्टर कुणी लावले, कुणाच्या इशाऱ्यावरून लावले याचा शोध पोलीस घेत आहेत.
भारतात मास्क अनिवार्य
दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्गाचा हाहाकार उडाल्याने देशातील नागरिकांना मास्क घालावा लागणार आहे. अमेरिकेत सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी मास्क उतरवले आहेत. सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन अर्थात सीडीसीच्या सूचनेनंतर अमेरिकेने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र अमेरिकेप्रमाणे सध्या भारतातील वातावरण तसं नाही. त्यामुळे भारतात जरी दोन्ही डोस घेतले असतील, तरी मास्क लावणं आवश्यक असल्याचं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही भारतात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे, असं डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचं नवं रुप समोर येत आहे. त्यातच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. त्यामुळे जसं अमेरिकेत मास्क उतरवला आहे, तसं भारतात अजिबात करु नका, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.