राजकारण

मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारे अन्वय नाईक प्रकरणात गप्प का?

पोलिसांचं तोंड काळं झालं ही भाषा फडणवीसांना शोभते का?; अन्वय नाईक यांच्या कुटुंबाचा सवाल

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तातडीनं तपास होतो. त्या प्रकरणी लगेच कारवाई होते. मग अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला (anvay naik death case) तीन वर्षे उलटूनही दोषी मोकाट कसे फिरतात?, असा सवाल अन्वय यांच्या पत्नी आणि मुलीनं उपस्थि केला. अन्वय यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी फडणवीस सरकारवर केला.

मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर जिलेटिननं भरलेली गाडी सापडल्यावर विधानसभेत आक्रमक होणारा, गदारोळ करणारा पक्ष आमच्या प्रकरणात शांत का?, असा सवाल नाईक मायलेकींनी उपस्थित केला. मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून सीडीआर काढणारे आमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करत आहेत? गुन्ह्यातील आरोपी तुमचे नातेवाईक आहेत का? न्याय केवळ श्रीमंतांनाच मिळणार का, असे अनेक प्रश्न अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी विचारले आहेत.

अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ अन्वय नाईक यांनी उभारून दिला. त्याचे पैसे थकवल्यानं, गोस्वामींनी धमक्या दिल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाला ३ वर्ष उलटूनही अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र पोलिसांचं तोंड काळं झालं असं फडणवीस म्हणतात. असं बोलणं फडणवीस यांना शोभतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गेल्या सरकारनं अन्वय नाईक प्रकरण दाबल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. गेल्या सरकारमध्ये आरोपींना अटकदेखील झाली नव्हती. आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. आरोपींना इतकी स्पेशल ट्रिटमेंट कशी दिली आणि ती त्यावेळी कोणाच्या आदेशावरून दिली गेली, असे सवाल विचारत अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी अप्रत्यक्षपणे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

सर्वात मोठ्या आरोपावर नाईक कुटुंबाचं पहिलंच थेट उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन भाजपकडून होणाऱ्या आरोपांसंदर्भात नाईक कुटुंबीयांकडून पहिल्यांदाच थेट उत्तर देण्यात आले. मुळात हा व्यवहार आठ ते दहा वर्षांपूर्वीचा आहे आणि जमीन खरेदी किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे का? या व्यवहाराचा आणि अन्वय नाईक मृत्यूप्रकरणाचा संबंध आत्ताच का जोडला जात आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला.

माझे वडील हे वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होते. त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. अगदी शेवटपर्यंत ते प्लॉटिंग करुन जमिनी विकायचे काम करत होते. यामध्ये गैर ते काय आहे? भाजप नेत्यांकडून आरोप होत असलेल्या जमिनीच्या सर्व सातबाऱ्यांची माहिती द्यायला आम्ही तयार आहोत. अगदी आमच्या बँकेचे तपशीलही आम्ही सादर करु. मात्र, या प्रकरणातील आरोपींनीही (अर्णव गोस्वामी) त्यांच्या बँक खात्याचे तपशील सादर करावेत. प्रसारमाध्यमांसमोर एकदा चाय पे चर्चा होऊनच जाऊ दे, असे अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी म्हटले.

किरीट सोमय्यांचा जीव वर-खाली का होतो?’
याप्रकरणात आमची दोन माणसं गेली आहेत, म्हणून आमचा जीव वर-खाली होतो. तर अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे ते आमच्यावर आरोप करतात. मात्र, याप्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जीव इतका वर-खाली का होत आहे, याचे कारण आम्हाला अद्याप समजलेले नाही, असे आज्ञा नाईक यांनी म्हटले.

या संपूर्ण प्रकरणात आम्हाला शिवसेनेने मदत केली आहे. आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळावा, एवढीच आमची इच्छा आहे. कुणाला सीबीआय किंवा अजून कुठली चौकशी करायची असेल, तर ती खुशाल करावी, असे अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button