खरं तर ओरिजनल शब्द ‘कवित्व’ असा आहे..पण झालंय काय.. कोरोनामध्ये लोकांची ‘चिडचीड’ वाढलेय आजकल.! कोणत्याही घराला तुम्ही कान लावून पहा..मृदुंगाच्या ऐवजी वादंगाचे आवाज ऐकू येतील.!
त्यात भरीस भर म्हणून कालच्या निवडणुकांच्या निकालांनी उष्णतेचं तापमान सेल्सियसमध्ये जास्त वाढलं.!
अर्थात खरंतर कालच्या निकालांनी उत्तम टाईमपास झाला..एक दिवस का होईना, कोरोनाची काव-काव विसरायला झालं.!
सकारात्मक निकाल होते कालचे.! पण एकदा अपेक्षांचं ओझं वाढलं किंवा त्या एव्हरेस्टला पोहोचल्या तर..अपेक्षाभंगासारखं दारुण दुःख नसतं.!
कालचे निकाल विशेषतः बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ३ वरून ७५ च्या पुढे घेतलेली झेप नक्कीच कौतुकास्पद होतं.!
त्याचं श्रेय भाजपाच्या संघटन कौशल्याला जेव्हढं आहे त्यापेक्षा जास्त बंगालमधील लोकांमध्ये मोदींबद्दल नव्याने निर्माण झालेल्या आकर्षणाला देखील आहे.!
पण आधी जो ‘माहौल’ तयार झाला होता तो प.बंगाल भाजपच्या ताब्यात जाणार असाच होता.! ‘अबकी बार दो सौ पार’ अशी अमित शहांची घोषणाच होती. त्यामुळे ममता बॅनर्जींना देखील नेहमीपेक्षा ‘जास्त’ ताकद पणाला लावावी लागली असणार.!
सर्वत्र ताकदीचे ‘प्रतिकूल’ वातावरण असतांना एक भारतीय स्त्री नेतृत्व ज्या पद्धतीनं ‘उसळून वर’ आले आणि पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकून ‘एकटीच्या बळावर’ अधिक ‘सामर्थ्यवान’ झाले त्याचं जरा कुणी जाहीर कौतुक केलं तर बिघडलं कुठे.!!
असं म्हणतात, निवडणुकी दरम्यान जवळपास अख्खा पक्ष फोडला तिचा भाजपाने.! असं असेल तर मग ‘एकटी’ नाही तर काय म्हणायचे.
ममतांचा जागी या यशाचे हिस्सेदार नरेंद्र मोदी असते तर लोकांनी त्यांचाही (किंबहुना त्यांचाच..). ‘उदो उदो’ केला असता.!
असाही ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करणाराच देश आहे ना आपला.!
बरं माननीय ममता बॅनर्जी या लोकशाही असलेल्या देशांत लोकशाही मार्गानं निवडून आल्या आहेत.! याच देशाच्या सर्वपक्षीय अनेक मोठ्या नेत्यांपैकी त्या एक आहेत.!
बंगालच्या मुख्यमंत्री, नरसिंह रावांच्या सरकारात क्रीडा मंत्री, अटलजींच्या सरकारात रेल्वेमंत्री होत्या ना त्या.!
मग जसं काही आम्ही पाकिस्तानच्या नवाझ शरीफ किंवा मुश्रर्फचं कौतुक केल्यासारखी, किंवा बंगालमधून कुणी दहशतवाद्यांचा नेता निवडून आल्यासारखी जळजळ, मळमळ, पोटदुखी कालपासून बाहेर यायला लागली तेव्हा.. हल्ली काही विशिष्ट लोकांकडे ‘खिलाडूवृत्तीचा’ पूर्णपणे अभाव झालाय असे वाटू लागले आहे.!
मुळात जर ममता बॅनर्जी पाकिस्तानी, बांगलादेश धार्जिणी असती तर..अटलजींसारख्या जगाला आदरणीय असलेल्या पंतप्रधांनांनी तिला मंत्रिमंडळात घेतली असती का.!!
का, तुम्ही अटलजींपेक्षा मोठे आणि शहाणे झालात.! एव्हढं लांबचं कशाला, तुम्ही ज्यांचे ‘पोवाडे’ गाता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैयक्तिक संबंध ममतांशी उत्तम आहेत. ते त्यांना दीदी म्हणतात, साडी देतात असं ऐकून आहे.!
मोदींबद्दल काहीही मते असू देत पण ते स्त्रियांचा अतिशय योग्य आदर बोलताना, व्यक्त होतांना करतात.! मग कट्टर समर्थकांमध्ये स्त्रीचा अनादर करण्याची, तिला तुच्छ मानण्याची दृष्ट बुद्धी कोठून आली.!!
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असल्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या ‘दिखाऊ’ उत्साही भक्तांपासून वेळीच लांब राहावे नाही तर एक दिवस हे लोक त्या उत्तम व्यक्तिमत्वाला बुडवतील.!
एका कार्यनिपुण भक्ताची प्रतिक्रिया इथं लिहायलाही शरम वाटते.. ” एव्हरेस्ट जिंकली पण मोरीत पडली..” म्हणे.!
सुशिक्षित आणि उच्चशिक्षित असलेल्या या मंडळींची भाषा एका स्त्रीबाबत इतक्या खालच्या थराला जाते.!!
मी फोटो काढून ठेवलाय त्या अविस्मरणीय पोस्टचा.!
अरे, मग आमच्या गावचे ‘कार्यनिपुण’ भाजपा कार्यकर्ते सुनील गोगटेंना माझा सलाम आहे. त्यांनी माझ्याच पोस्टवर ममता बॅनर्जी यांचं मोठ्या मनानं अभिनंदन केले आहे.!
एका ‘भिरभीरलेल्या’ भक्ताने मला आणि माझ्यासारख्या दिदींचं अभिनंदन करणाऱ्यांना सरळ सरसकट ‘नालायक’ म्हटलंय.!
एक राज्य गेलं म्हणून या उन्मादी भक्तमंडळींमध्ये एव्हढं का नैराश्य येतं.. आलं.!
मुळांत काल मला भाजपा समर्थकांच्या आशा पोस्ट्स अपेक्षित होत्या..अरे यावेळी ७० च्यावर गेलो..पुढच्यावेळी दिडशेच्या वर नक्की जाऊ.!! तर मीही त्यांचे स्वागत केले असते.!
त्याउलट पश्चिम बंगाल पाकिस्तान किंवा बांगलादेशच्या ताब्यात गेल्यासारख्या ‘उरफाट्या’ पोस्ट्स फिरू लागल्या आहेत.! म्हणे हिंदू खतरमे.! अरे, हट.
अरे,मग ‘इस्लाम खतरमे’ है असं केव्हातरी म्हणणाऱ्या काही कट्टरतावाद्यांमध्ये आणि तुमच्यात फरक तो काय.!
बहुसंख्य मुस्लिम बांधव शहाणा-सुरता झालाय निदान भारतातला तरी..तो रोजी-रोटी, शिक्षण आणि प्रगतीची आस धरून चालला आहे..त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शांतता हवी आहे.!
या देशावर पंधराशे वर्षे परकीय मुस्लिम आक्रमकांनी राज्य केलं, दीडशे वर्षे कॅथलिक इंग्रजांनी राज्य केलं तेव्हा नाही आला हा हिंदू खतऱ्यामध्ये.!
हिंदू हा नुसता धर्म नसून ती एक संस्कृती आहे आणि तिची पाळंमुळं घट्ट रोवली गेली आहेत.
हिंदू काय ‘लेचापेचा’ आहे का, एव्हढ्यानं खत्र्यात यायला.! उगाच काहीही हं.. बाबूराव.
तुम्ही एक निवडणूक काय हरलात, (म्हणजे सत्ता नाही आली..) अख्ख्या हिंदूंना गृहीत धरता काय.!
पंच्याहात्तरचेवर सीट्स आल्यात भाजपाच्या बंगालमध्ये.. त्या तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येनं मतदान करणाऱ्या हिंदूंशी ‘प्रतारणा’ करताय असं नाही वाटत का असला नकारात्मक गोबेल्सी प्रचार करून.!!
(थोडं धीर धरा नं.. कदाचित पुढच्या वेळेला आणखी सीट्स वाढू शकतील.! )
अर्थात हे सगळं अकारण जनभावना भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, उगा चिडचीड करणाऱ्या, उन्माद दाखविणाऱ्या विशिष्ट मंडळींसाठी आहे..!!
सरसकट भाजपा किंवा संघपरिवारासाठी नाही. त्यातील अनेक उत्तम सन्माननीय लोकांबद्दल मला आदर आहे आणि मैत्रीचे उत्तम संबंध देखील आहेत.!
पण म्हणून मी घोड्यासारखा पट्टी लावलेला ‘कुणा एका बाजूचा’ अंध-समर्थक नाही.!
‘उघडा डोळे बघा नीट’ हे तर माझे पहिल्यापासून ब्रीदवाक्य आहे..आणि राहील.!
आजही नितीन गडकरी, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे शांत आणि संयमी लोक भाजपामध्ये आहेत अशी माझी धारणा आहे..!
आज माझ्या एका अत्यंत आवडत्या नेत्याचं आणि भाजपाला अत्यंत कष्टाने देशभर वाढविणाऱ्या बहुभाषा-आयामी स्वर्गीय प्रमोद महाजनांचा स्मृतिदिन आहे.!
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.! ️
ता.क. कोरोनाचा भर (बहर..).वाढतोय.! ही या ‘तातडीच्या’ निवडणुकांचीही ‘देण’ही असू शकते.! कृपया हा कोरोना जाईपर्यंत आणखी निवडणूका-निवडणुका खेळूया नकोत.! आता तरी शहाणे व्हा.!!