पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.
आम्हाला खात्री होती सत्याचा विजय होणार, पोलीस आणि गुंडांच्या मदतीने हे राज्य सुरु आहे. सारखं पोलिसांच्या मदतीने लोकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतात. हे कोर्टात जाऊन थपडा खातात. जेवणासारखं थपडांचीसुद्धा त्यांना आवश्यकता झालेली आहे. ज्या खाल्ल्या शिवाय त्यांना झोप लागत नाही. हे अमानवीय कृत्य झालं. जेवताना राणेंना उठवलं गेलं. सामान्य माणसाशीसुद्धा असा व्यवहार करायचा नसतो. त्यांचा नंतर बीपी वाढला. शुगर वाढली. त्यांना रुग्णालयात नेलं नाही. हे काय चाललं आहे. जी सत्ता अकृत्रिमपणे मिळवली त्या सत्तेची एवढी नशा. यांचं हम करेसो कायदा असं सुरु आहे. हे प्रत्येक विषयावर थपडा खातात. अनिल परब यांना आम्ही कोर्टात खेचणार आहोत. एका मिनिस्टरला हे अधिकार दिले आहेत का? फोर्स वाढवा. काही करुन अटक करा, कसली ऑर्डर मागताय, कशाला डिले करताय, हे अनिल परब यांचे वक्तव्य म्हणजे राणेँवरील कारवाई सुडबुद्धीने करण्यात आली आहे.
आता बघा उद्यापासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करण्यात येणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. किती घाबरत आहात तुम्ही. राणेंच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय म्हणून किती घाबरले तुम्ही. तरीही जनआशीर्वाद यात्रा चालू होणार. काय करता बघू, असं थेट आव्हान चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. राणेंना जामीन देताना काही नियम घातले असतील. राणे काही न बोलता जरी सिंधुदुर्ग जिल्हात गेले तरी हजारोच्या संख्येनं लोक येतात. भाडोत्री गुंड गोळा करुन त्यांच्या घरासमोर धिंगाणा घालता काय? आमच्या पुण्याच्या कार्यालयात दोन जण चोरुन कोंबड्या सोडता काय? शिवसेनेला आज जशास तसं उत्तर दिलं आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. चळवळीतून आलेली माणसं आहोत आम्ही. कुणी धमकी द्यायचं कारण नाही. तुमच्यासारखं भाडोत्री गुंड आणून काम नाही करत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
राणे साहेबांना जामीन मिळाला नसता तर राज्यभर आम्हाला प्रखर निषेध व्यक्त करावा लागला असता. तुमचा कोकणातला बेस संपला. लोकांना तुमचा चेहरा कळला, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. अनिल परब हे काय गृहमंत्री किंवा न्यायाधीश आहेत काय? ते पोलीस अधीक्षकांना राणेंना बळाचा वापर करा म्हणून आदेश कसा काय देऊ शकतात? शपथ घेताना तुम्ही गोपनियतेची आणि राज्याची शपथ घेता, हे राज्याचं हित आहे काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच पाटील यांनी केली आहे. आम्ही नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातही कोर्टात जाणार आहोत. उपसभापती कुठल्याही पक्षाचे नसतात. पण गेल्या महिनाभरापासून त्या शिवसेनेच्या प्रवक्त्याप्रमाणे भूमिका मांडत आहेत. एवढीच हौस आहे तर उपसभापतीपदाचा राजीनामा द्या, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. आमच्या भाजपमधून गेलेल्या मनिषा कायंदे यांचंही काहीतरी चालू होतं. सध्या भास्करराव जाधव यांच्यातर अंगात आलं आहे. सगळ्यांना उद्धव ठाकरे यांच्या गुडबुक्समध्ये राहायचं आहे. पण यांचं काय चालू आहे काही कळायला मार्ग नाही, अशी टीकाही पाटील यांनी गोऱ्हे, कायंदे आणि भास्कर जाधवांवर केलीय.