Top Newsराजकारण

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत अनिल परबांची शरद पवारांशी चर्चा

संपात फूट पडल्याचे चित्र; आझाद मैदानावरील आंदोलकांची संख्याही रोडावली !

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात फूट पडल्याचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब यांनी भेट घेत संपावर चर्चा केली आहे.

शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. त्यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते.

एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. शुक्रवारी १७ आगारांमधून ३६ बसगाड्या सोडण्यात आल्या व त्यातून ८२६ प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केला,

आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांची संख्या निम्म्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्या बंद असल्याचा मोठा फटका राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना वाहने उपलब्ध नाहीत. रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शिवाय परीक्षांपासूनही त्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button