राजकारण

ईडीच्या चौकशीला आनंदराव अडसुळ यांचे हायकोर्टात आव्हान

मुंबई : सिटी को- ऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटी घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार व शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांच्यावर ईडीने मनी लॉंडरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याविरोधात अडसुळ यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी अडसुळ यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंतीही अडसुळ यांनी न्यायालयाला केली. या याचिकेवरील सुनावणी एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती. अडसुळ यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आली आहे.

तपासाचा भाग म्हणून अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. ईडीने २७ सप्टेंबर रोजी आनंद अडसुळ व त्यांचा मुलगा अभिजीत अडसुळ यांना समन्स बजावले. मात्र, अडसुळ यांनी दिल्लीमध्ये साखरपुडा असल्याचे कारण देत चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी तब्येत खराब झाल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल झाले. अडसुळ यांची तब्येत ठीक आहे. असेच घडत राहिले तर तपास यंत्रणेला तपास करणे अवघड जाईल. ईडीने समन्स बजावले की वैद्यकीय कारण दिले जाते, असे सिंग यांनी म्हटले. त्यावर न्यायालयाने अडसुळ यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांना अडसुळ यांचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देत याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button