अमृता फडणवीसांनी पुन्हा शिवसेनेला डिवचले!
मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. बऱ्याचदा त्या अनेक राजकीय विषयांवरही भाष्य करत असतात. आता मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये स्फोटकं ठेवण्याच्या प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू, असं म्हणत वाझे प्रकरणाच्या आडून त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबतही त्यांनी सूचक विधान करत चर्चेला विषय दिलाय.
आपल्या युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय टिपण्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. अमृता फडणवीस यांच्या नावाच्या चर्चेचं नवं कारण त्याचं नवं फोटोशूट ठरलं आहे. आता मोटिव्हेशनल कोट शेअर करत अमृता यांनी फोटो शेअर केले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्या नेहमीच नवनवीन अंदाजात फोटो शेअर करत असतात.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत, असेही गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.