मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अमृता फडणवीस यांनी गेल्या महिन्यात आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली होती. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या गाण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यावेळी, गणेशोत्सवाच्या अगोदर आपलं नवीन गाणं येतंय, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, त्याचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे, ‘गणेश वंदना’ या शीर्षकाने हे गाणे रिलीज करण्यात आलंय.
अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. ‘गणेश वंदना’ या गाण्यातूनही त्यांनी एक सुंदर मेसेज दिला आहे. कोरोना काळातील कोविड योद्ध्यांना हे गाणं त्यांनी समर्पित केलंय. एकूण ४ मिनिट ४९ सेकंदाचं हे गाणं आहे. या गाण्यात अमृता फडणवीस तुम्हाला डॉक्टरच्या वेशात दिसून येतील.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1433680216962912259
‘गणेश वंदना’ हे गाणे सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना समर्पित केलं आहे. ‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’ असे त्यांनी या गाण्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमृता यांनी हे गाणे गायिले असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना कोणताही सण, उत्सव असो समाजप्रतीची त्यांची कर्तव्ये पार पाडावी लागतात हे सांगण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला आहे.