अर्थ-उद्योगराजकारण

मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिल्याने देशात कोरोना वाढला : अमर्त्य सेन

मुंबई : मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिले आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, अशी टीका आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केली आहे. मुंबईत राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसला. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठल्यामुळे ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला. यावरून विरोधकांनी आणि तज्ज्ञांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आता अमर्त्य सेन यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकार जागतिक स्तरावर आपली अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिले की, भारतच संपूर्ण जगाला वाचवू शकेल. मात्र, त्याच कालावधीत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि अन्य समस्याही मोठ्या प्रमाणात समोर आल्या. लोकांना त्याचा विळखा बसत असताना सरकार दुर्लक्ष करत राहिले. भारतात आधीच असलेल्या सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोरोना साथीच्या काळात अजूनच गंभीर झाल्या आहेत.

भारत औषध निर्मितीच्या बाबतीत समर्थ आहे. भारत कोरोना संकटाचा सामना योग्य प्रकारे करू शकला असता. मात्र, सरकारी पातळीवर असलेल्या संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करू शकलो नाही, असे सेन म्हणाले. यासह अन्य काही मुद्द्यांवरून अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button