चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर काँग्रेसकडून चर्चा सुरू असतानाच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध दंड थोपाटले आहेत. मुख्यमंत्री करायचाच असेल तर तो माझ्या गटातील करा. नाही तर बहुमत चाचणीसाठी तयार राहा, असा इशाराच अमरिंदर सिंग यांनी हायकमांडला दिला आहे. त्यामुळे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून हा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्या समर्थक आमदाराला मुख्यमंत्री नाही केलं तर फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असं सिंग यांनी हायकमांडला सांगितल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याची निवड करणं काँग्रेससाठी डोकेदुखी झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस हायकमांडने पंजाबचा मुख्यमंत्री आजच निवडण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी आमदारांची बैठकही रद्द करण्यात आली आहे. अंबिका सोनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचंही हायकमांडने ठरवलं होतं. पण सोनी यांनी नकार दिल्याने मुख्यमंत्रीपदाचा पेच आणखीनच वाढला आहे. सिद्धू समर्थक या बैठकीत सिद्धू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता असल्याने हायकमांडने ही बैठकच रद्द केली आहे. सिद्धू गटाने डोकं वर काढू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सिद्धू यांना त्यांच्या समर्थकांना शांत करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सूत्रांच्या मते अंबिका सोनी यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. अंबिका सोनी या सोनिया गांधी यांच्या अंत्यत जवळच्या समजल्या जातात. त्या माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच अंबिका सोनी यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच सोनी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे. शिवाय सोनी या हिंदू खत्री असल्यानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री
दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. अंबिका सोनी मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉ. राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी नवज्योतसिंगला विरोध : अमरिंदर सिंग
अरमिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सिद्धू काहीही सांभाळू शकत नाहीत, मी त्यांना चांगलंच ओळखतो, ते राज्यासाठी धोकादायक ठरतील, असे सिंग यांनी म्हटले. कॅप्टन सिंग यांनी एका मुलाखतीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट प्रहार केला. नवज्योतसिंग सिद्धूला जर पंबाजच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवला, तर त्यास माझा विरोध राहिल. कारण, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, पाकिस्तानसोबत नवज्योत यांचे संबंध आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सिद्धूशी खास मैत्री आहे, तर जनरल बाजवाही सिद्धूचे मित्र आहेत, अशी घणाघातील टीका कॅप्टन सिंग यांनी सिद्धूंवर केली आहे.