राजकारण

पुण्यात मनसेसोबत युती आणि मुंबईत फटका असे होऊ नये : चंद्रकांत पाटील

पुणे : मी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली, तरीदेखील काही मुद्दे माझ्या मनात आहेत, त्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट झाली होती. त्यावेळी राज ठाकरेंची उत्तर भारतीय संमेलनातील भाषणांवरुन दोघांमध्ये चर्चा झाली होती.

त्यावेळी राज ठाकरेंनी आपली भाषणाची सीडी पाठवतो ती भाषणं ऐका असं सांगितलं होतं. त्यानुसार मनसेकडून चंद्रकांत पाटलांना राज ठाकरेंच्या भाषणाच्या सीडी पाठवल्या. चंद्रकांत पाटलांनी ते भाषण ऐकून आता आपली प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली. माझ्या मनात काही मुद्दे आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन. मनसेसोबत युतीबाबत आम्हाला केवळ पुणे किंवा विशिष्ट क्षेत्राचा विचार करून चालत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. पुण्यात युती केली आणि त्याचा फटका मुंबईत बसला असे होऊन चालणार नाही.

मनसेच परप्रांतीयांना होणारा विरोध ही युतीतील अडचण आहे. ही अडचण दूर झाली तर मी ओके देईन, असं चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी थेट सांगितलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता अधिक बळावली होती. विशेष म्हणजे ही युती पालिका निवडणुकांसाठी राहणार नसून लोकसभा आणि विधानसभेतही राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात आणि राज-चंद्रकांतदादांच्या भेटीत नेमकं काय ठरतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button