मुंबई : सन २०१९ मधील राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत पाठवले, अशी चर्चा होती, हे खरे आहे. पण, मी त्यांना पाठवले असते, तर त्यांनी राज्यच बनवले असते. त्यांनी अर्धवट काही काम केले नसते. मीच अजित पवार यांना पाठवले होते यात काहीच अर्थ नाही. मात्र, माझे एक वक्तव्य शिवसेना आणि भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती. आम्ही काहीही लपवत नव्हतो असं म्हटलंय.
शरद पवार सांगत आहेत, त्यामुळे ते सत्य असावं. भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होती. त्यामुळे यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला. अजित पवार यांना गाठा, असे उपक्रम त्यांचे सुरु होते. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती, हे मला माहिती होते. तेही आमच्याशी बोलले होते. त्या काळात आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण कोणाशी बोलतो आहे. कोण कोणाला भेटायला जात आहे, त्या काळात आमच्यात अत्यंत पारदर्शकता होती. हे भाजपला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घ्यायला गेले तेव्हादेखील आमच्यात पारदर्शकता होती, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना, राजकारणात पारदर्शकता असायला हवी. राज्यात एवढी मोठी घडामोड घडत होती. राज्यात सत्तापरिवर्तन होत होते. कोणता दगड आड येऊ नये, तो आला तर कसा काढता येईल हे आम्ही करत राहिलो. आमच्याकडे तेव्हादेखील जेसीबी होता. आमच्यात पारदर्शकता होती त्यामुळे संध्याकाळपर्यंत सर्व आमदार परत आले. अजितदादादेखील तेव्हा परत आले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरदेखील राऊत यांनी भाष्य केलं. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या रात्रीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसाचे निर्बंध येऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. दिवसाचे निर्बंध आले तर महाराष्ट्राचं अर्थचक्र अडकून पडेल. नोकरी, रोजगार यावर मोठं संकट येईल. त्यामुळे मोठं संकट उभं राहील. आपले प्रधानमंत्री मास्क लावा असं सांगतात, पण स्वत: लावत नाहीत. आम्ही त्यांचे ऐकतो. म्हणून जनतादेखील मास्क लावत नाही, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.