पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना पवारांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. पुण्यातले काही भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी अजित पवार भाजपला धक्का देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्त्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील भाजपचे काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पण मी खालच्या पातळीवरचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिलेली आहे. पालिका हाती असल्यास चांगलं काम करता येतं, असं अजित पवार म्हणाले.
विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवूनच आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्षे काम केलं. पण २०१३-१४ मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा होती. त्यामुळेच चांगलं काम करूनही आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र आता भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. ज्यांना यायचं आहे, त्यांनी अपात्र ठरता कामा नये, असं मी त्यांना सांगितलं आहे. कारण अपात्र ठरल्यावर ६ वर्षे निवडणूक लढवता येत नाही. आत्ता जे पक्षात आले आहेत, ते अपक्ष आहेत. असेही काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा पवारांनी केला.
आम्ही काही साधू संत नाही, आम्ही राजकारणी…
आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनंही जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी अजित पवार यांनी आज महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही काही साधू संत नाही, आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि काम करायचं म्हटलं तर कॉर्पोरेशन ताब्यामध्ये असल्यास त्या संदर्भात समन्वय साधता येतो, असं सूचक वक्तव्य करत अजितदादांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.
राजकीय जीवनात काम करताना अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. पाठिमागच्या काळामध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, भाजप सत्ताधारी होती. त्यावेळेस काही लोकांना असं वाटत होतं आपण भाजपमध्ये जावं, म्हणजे मग आपण रुलिंग पार्टीमध्ये राहू. मग आपल्या वॉर्डमध्ये कामं करता येतील. तशा पद्धतीने आता आम्ही काही करतो. तुम्ही सगळे मला अनेक वर्षांपासून ओळखता. त्यासंदर्भामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही काही साधू संत नाही, आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि काम करायचं म्हटलं तर कॉर्पोरेशन ताब्यामध्ये असेल तर त्या संदर्भामध्ये समन्वय साधता येतो. त्यामुळे माझी इच्छा आहे की सर्वांना माहित आहे की गेली २५ वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही कशा प्रकारचं काम केलं. आणि काम करत असताना नेहमी विकासाचं व्हिजन ठेवूनच आम्ही काम करत आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कस सांगू ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणावेळी भाजपचा ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कस सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.