Top Newsफोकस

धुळीच्या वाऱ्यामुळे हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर; थंडीचा जोर, तापमानात मोठी घट

मुंबई : सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली आहे. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात काल घट झाली असल्याचं पाहिलं मिळालं. रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६ आणि ७ अंशांची घट झाली होती. हे गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे. कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. यासोबतच रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ४३६ म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता. भांडुप येथे ३३६, माझगाव येथे ३७२, वरळी येथे ३१९, वांद्रे कुर्ला संकुल येथे ३०७, चेंबूर ३४७, अंधेरी ३४० असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला.

पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. सुमारे तास २०-३० किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

मुंबईत कालची रात्र सर्वाधिक थंडीची

देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम मुंबईतही दिसून येत आहे. राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान १६ अंशांवर पोहोचले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.

राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी

महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुण्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी २२ आणि २३ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.

धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते. त्यामुळेच वातावरणात काल सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे. मात्र या धूळ युक्त हवेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असून सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हवेची गुणवत्ता पातळी खालावली

मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालावल्याचं दिसून येत आहे. काल मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १८० वर होता. मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार झाला होता. दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत, मालाडमध्ये एक्यूआय ३१६, तर माझगावमध्ये ३१५ एक्यूआय होता.

थंडीचा जोर, तापमानात मोठी घट

राज्यातील अनेक भागातील तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये २५ अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. राज्यात मागील २४ तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. मुंबईतील कमाल तापमानात आज मोठी घट नोंदवली गेली आहे. रविवारी सांताक्रुज वेधशाळेत कमाल तापमान २३.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय तर कुलाब्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस होतं. शनिवारी कमाल तापमान हे २९.७ अंश सेल्सिअस होतं. मुंबईत मागील १० वर्षातील सर्वात कमी कमाल तापमान नोंदवलं गेलंय. आज सकाळपासूनच धुक्याचं चित्र मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बघायला मिळालं होतं. सोबतच दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं कमाल तापमानात घट झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button