पणजी : माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी बंड केल्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनीही दंड थोपटले आहेत. तेही बंडाची भाषा करू लागल्याने भाजपच्या गोवा नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्पल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला. सिद्धेश नाईक यांनी तिसवाडी तालुक्यातील कुंभारजुवे मतदारसंघात उमेदवारी मागितली होती. भाजपने ती नाकारली. त्यामुळे नाईक भडकले आहेत. भाजपने आमदार पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जेनिता मडकईकर यांना कुंभारजुवेत तिकीट दिले. तथापि, जेनिता यांना पराभूत करावे, असे जाहीर आवाहन सिद्धेश नाईक यांनी केले. कार्यकर्त्यांनी सांगितले तर मी अपक्षही लढेन असे सिद्धेश नाईक यांचे म्हणणे आहे.
भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात तळ ठोकलेला आहे. त्यांनी सिद्धेश नाईक व अन्य असंतुष्टांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही बंड केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पार्सेकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या करून पाहिला. पार्सेकर यांनी कडक भूमिका घेत बुधवारी भाजपला प्रत्युत्तर दिले. आपण कुणाच्याच दबावाला भीक घालणार नाही, ज्यांना आपल्याशी बोलायचे आहे त्यांनी समोर यावे व डोळ्यांना डोळे भिडवून बोलावे, असे पार्सेकर म्हणाले.
विरोधी उमेदवार कायम भाजप विरोधक, गंभीर गुन्हेही दाखल; उत्पल पर्रीकर यांचा आरोप
भाजपनं पणजीतून ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी कायमच भाजपच्या विरोधात काम केल्याचा आरोप उत्पल पर्रिकर यांनी केला. भाजपनं यावेळी ज्यांच्या या क्षेत्रातून उमेदवारी जाहीर केली आहे, ते एक डिफॉल्टर आहेत. त्यांनी कायमच भाजपच्या विरोधात काम केले. आमचे मतदार त्यांना मतदान करू इच्छित नाहीत. आमचे कार्यकर्तेही काम करू इच्छित नाहीत. त्यांच्याविरोधात बलात्कार आणि अन्य प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, असं पर्रिकर म्हणाले. मी ज्यावेळी पक्षाचा राजीनामा दिला तेव्हा या जागेवर चांगला उमेदवार देण्यास सांगितलं होतं, असंही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरण्यावरही उत्पल पर्रिकर यांनी उत्तर दिलं. माझ्यासाठी हा कठीण निर्णय होता. माझ्या वडिलांनी या विधानसभा क्षेत्रात काम करत पक्षाला मोठं केलं. जवळपास दोन दशकं ते इथे होते. ज्यांनी पक्षाला उभं करण्यास मदत केली त्या सर्व कार्यकर्त्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, असंही ते म्हणाले.
तुम्ही राजकारणात प्रवेश करू नये असं वडिलांना वाटत होतं, असा सवाल त्यांना यावेळी करण्यात आला. ज्यावेळी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात काही चुकीचं होतंय हे मी पाहिलं तेव्हा कोणाला ना कोणाला त्या ठिकाणी उभं राहावं लागणार होतं. मी त्यांच्या मुलगा आहे म्हणून मी आज राजकारणात आलो. पक्ष मला संधी देईल असं वाटत होतं, असं उत्पल पर्रिकर म्हणाले. गेल्या वेळी मी निवडणूक लढवू शकलो असतो. पक्षाचे कार्यकर्तेही मला तसं करण्यास सांगत होते. परंतु मी पक्षासोबत उभा राहिलो, मी त्यावेळी स्वीकार केलं आणि मी काहीही म्हटलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.