पुणे : राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा भ्रष्टाचार केल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांत काहीजण बेछूट आरोप करत आहेत. एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा म्हणतो १० हजार कोटींचा घोटाळा झाला. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडल्याचा दावा करताना अजित पवार यांनी विक्री झालेल्या साखर कारखान्यांची यादीच जाहीर केली.
जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कालच इशारा दिला होता. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जातेय. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी इशारा काल दिला होता. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. अनेक साखर कारखान्यांची सरकारी यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील ६४ कारखाने हे दुसऱ्या कंपन्यांनी चालवायला घेतले आहेत अथवा ते विकण्यात आले आहेत. हे कारखाने किती किंमतीला विकले गेले, याचा सविस्तर तपशीलच अजित पवार यांनी मांडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवर आज उत्तर दिलं. महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. त्यांनी कारखाने विक्रीच्या व्यवहाराचे रकमांसह वाचन करुन दाखवलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एकूण ३० कारखाने विकले असल्याची यादी अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांनी सांगितलं की, राज्य शिखर बँकेने राज्यातील वेगवेगळे ३० सहकारी साखर कारखाने विकले. सहा सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले. सहा सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आलेत, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील ६४ सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेलेत किंवा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिलेत किंवा भाडेकरारावर चालवले जात आहेत, असं अजित पवार म्हणाले.
जरंडेश्वर साखर कारखान्याबाबबत सतत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातो. मला लोकांना सांगायचंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला.जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले की, नियम सर्वांना सारखेच आहेत. आज सगळी कागदपत्रं घेऊन आलो आहे, असं ते सुरुवातीला म्हणाले. ड्रग्ज प्रकरणात कुणाचाही मुलगा असेल तर त्यावर कारवाई करा, असंही ते म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कालच इशारा दिला होता. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जातेय. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी इशारा काल दिला होता.
ड्रग्जप्रकरणावर अजितदादा संतप्त
मुंबईत ड्रग्जप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या त्यावेळी कुणी तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला होता. त्यावर अजित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. एकाने तर माझाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. मला संपूर्ण राज्य ओळखतं. तरीही माझा फोटो व्हायरल केला. फोटो व्हायरल करणाऱ्याला लाज, लज्जा, शरम आहे की नाही?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. एनसीबीने ड्रग्जप्रकरणी धाडी मारल्या होत्या. त्यावेळी एका बड्या नेत्याचा मुलगाही या ठिकाणी असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यात पार्थ पवारांचं नावही पुढे आलं होतं, असा सवाल अजितदादांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, जे काही असेल ते तपासा. उगीचच कुणाच्या मुलांचं नाव घेऊन त्यांचं करिअर का बरबाद करता. काही असेल तर त्याला शिक्षा करा. तुमच्या घरातला असो माझ्या घरातला असेल किंवा इतरांच्या घरातला असेल. नियम कायदा सर्वाना समान असतो, असतो का नसतो? असा सवालच अजितदादांनी केला. मी अलिकडे बघितलं की मीडियाने दखल घेतली पाहिजे अशी नावं सध्या घेतली जात आहेत. मध्यंतरी तर सोशल मीडियात अजित पवारांचाच फोटो दिला होता. देणाऱ्याला लाज, लज्जा, शरम काही आहे की नाही? मला अख्खा महाराष्ट्र ओळखतो, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक युद्धावर बोलण्यास नकार दिला. एक मिनिट… मला त्याबद्दल काही विचारू नका. मलिकांचे प्रश्न त्यांना विचारा. समीरचे प्रश्न समीर यांना विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आलो नाही. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विद्यापीठ पुलाच्या बाबत बोलायला आलो. कोरोनाबाबतचं सांगितलं. तसेच दरोड्याबाबत मी बोललो. एका मुलीच्या हत्येबाबत बोललो. ऐका जरा… मी मागही सांगितलं की इतरांनी काही केलं आणि ते असं म्हटले यावर उत्तरे द्यायला मी बांधिल नाही, असं त्यांनी संतप्त होतच स्पष्ट केलं.
अजित पवार हे मलिक यांच्या प्रश्नावर बोलण्यास नकार देत असताना पत्रकार त्यांना वारंवार प्रश्न विचारत होते. त्यावर अजितदादा अधिकच भडकले. थांबा ना साहेब… मी त्यांचं उत्तर द्यायला बांधिल नाही. मी तुम्हाला सांगितलं ना मलाही एक अधिकार आहे ना, नो कॉमेंट म्हणायचा. आहे की नाही…? जसा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ना, तसा मलाही नो कॉमेंट म्हणायचा अधिकार आहे. तुम्ही मला ते प्रश्न विचारू नका. मी उत्तर देणार नाही. मला काही तेवढेच उद्योग नाही. त्याबाबत मी जे काही सांगतो ते ऐकून घ्या. तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा मी निघून जातो, अशी संतप्त प्रतिक्रियाच त्यांनी व्यक्त केली.
We have re-opened theatres with 50% capacity from today. The theatre owners are demanding to reopen with 100% seating capacity but we have told them to wait till Diwali. After Diwali if situation is under control, then we'll increase the capacity: Maharashtra Dy CM Ajit Pawar pic.twitter.com/b2hiDignty
— ANI (@ANI) October 22, 2021
पुण्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी
पुण्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूक कोंडी होउ नये यासाठी पाडला. अनेक तंत्रांचा वापर करण्यात आलाय. हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येतायत. पण दिवाळीनंतर हे काम सुरु करण्यात येईल, असंही ते म्हणाले. पुण्यातील जंबो कोविड सेंटर कायम ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, असंही ते म्हणाले.
पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुणेकरांसाठी महत्वाची घोषणा केली. पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर थिएटर्स १०० टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.