नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यापासून भाजपाने ३ राज्यांचे मुख्यमंत्री बदलले त्यानंतर आता काँग्रेसदेखील हीच रणनीती वापरताना दिसत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री बदलून नवं धक्कातंत्र वापरलं आता राजस्थान काँग्रेसमध्येही हेच घडणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या २ दिवसांपासून राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट दिल्ली दरबारी जातीने हजर होते. याठिकाणी पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.
सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली. पायलट आणि राहुल गांधी यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे कारण राजस्थानात बंडखोरी केल्यानंतर मागील १ वर्षात पहिल्यांदाच सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. या भेटीत ३ मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यात राजस्थानमध्ये संघटनेत बदल करावा ही प्रमुख मागणी होती. तसेच मंत्रिमंडळ बदल आणि पक्षात पायलट यांची भूमिका यावर चर्चा झाली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी राजस्थानातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. तत्पूर्वी सचिन पायलट यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेहलोत यांचा सोनिया गांधींशी फोनवरून संवाद आणि सचिन पायलट यांची राहुल गांधींची प्रत्यक्ष भेट ही राजस्थानातील नवीन राजकीय समीकरणे असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत. पंजाबमधील घडामोडींनंतर राजस्थान आणि छत्तीसगडमधील राजकीय परिस्थितीवर लोकांच्या नजरा आहेत.
सचिन पायलट समर्थकांचा दावा आहे की, राजस्थानात पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पायलट यांना संधी द्यावी. त्यानंतर अशोक गहलोत मंत्रिमंडळात फेरबदल करून संघटनेच्या काही महिन्यात बदल करण्यात यावेत. पार्टी हायकमांडही गहलोत मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांची सुट्टी करून नवी मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या बदलासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत सुधारणा आणि पुन्हा कार्यालयीन कामकाजाच्या सुरु होण्याची पक्ष वाट पाहतोय.
राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी स्पष्ट केलंय की, अशोक गहलोत बरे झाल्यानंतर राजस्थानात बदल करणार आहोत. काय करायचं हे सगळं तयार आहे. प्रियंका गांधी यांच्या जवळचे सहकारी आचार्य प्रमोद कृष्णन यांनी एका ट्विटमधून संकेत दिलेत की, पंजाबमधील वारं राजस्थान आणि छत्तीसगडमधील वातावरण बिघडवू शकतात. परंतु काँग्रेसच्या सूत्रांचा दावा आहे की, पंजाबप्रमाणे राजस्थानात कुठलेही मोठे बदल पुढील वर्ष मार्चपर्यंत केले जाणार नाहीत. परंतु तोपर्यंत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारला पुन्हा संधी दिली जाईल. मात्र संघटनेत आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येतील असं त्यांनी दावा केला.