Top Newsराजकारण

गोव्यातील घडामोडी : भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकरांचे अपक्ष लढण्याचे संकेत

केजरीवाल, संजय राऊतांनी भाजप, फडणवीसांना डिवचले

पणजी/मुंबई : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ४० पैकी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र, आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे सांगतानाच अन्य पर्यायांना अर्थच नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरून सध्या जोरदार राजकारण तापलं आहे. भाजपने त्यांना पणजी सोडून दुसऱ्या दोन मतदारसंघातून लढण्याचे पर्याय दिल्याची माहिती समोर आली आहे तर, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांना पुन्हा चिमटे काढले आहेत. दुसरीकड्य उत्पल पर्रिकर यांना गोवा निवडणूक लढवण्यासाठी आपमध्ये येण्याची खुली ऑफर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क ट्विट करून दिली आहे.

भाजपने त्यांच्या कार्यकर्त्याला काय पर्याय दिले? ते त्याने स्वीकारावेत की नाही? यावर मी काय बोलणार ! त्यांचा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात हुशार आहेत. आम्ही महाराष्ट्रत पाहिले आहे. त्यांचे काम… एखाद्याचे मन वळवण्यात ते पटाईत आहेत. पण उत्पल त्यांचे ऐकत नसतील तर त्याची कारणे काय आहेत? हे गोव्याच्या जनतेला माहीत आहे. पणजीचे नेतृत्व विधानसभेत कोणत्या प्रवृत्तीने करावे असा प्रश्न उत्पल यांनी उपस्थित केलाय. ज्याला राजकीय चारित्र्य म्हणतात ते जपण्याचा मनोहर पर्रिकर यांनी प्रयत्न केला. एक आदर्श निर्माण केला. त्यांचे आमचे राजकीय मतभेद होते, पण राजकीय चारित्र्य त्यांनी नेहमी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मतदारसंघाचे नेर्तृत्व कोणत्या चरित्र्याने करावा हा प्रश्न उत्पल पर्रिकर यांनी उपस्थित केलाय. हे लक्षात घ्या ते गंभीर आहे. असे चिमटे राऊतांनी फडणवीसांना काढले आहेत.

अपक्ष लढल्यास उत्पल यांना सर्वजण पाठिंबा देऊ

भाजप ठरवेल की त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी. शिवसेनेचे उमेदवार उद्धव ठाकरे ठरवतील. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे उमेदवार ठरवतील. तो त्या पक्षाचाच अधिकार असतो. पण पर्रिकरांची केस वेगळी आहे. गोव्याच्या विकासात मनोहर पर्रिकर यांचे योगदान मोठे आहे. उत्पल त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार नसेल आणि ते अपक्ष उभे राहणार असतील तर आम्ही त्यांना पाठींबा देऊ हे आधीच जाहीर केलं आहे. इतर पक्षांनाही ते सांगण्याचा प्रयत्न करू. पर्रिकर यांच्याबाबतीत गोव्यातील लोकांच्या भावना खूप हळव्या आहेत. असेही राऊत म्हणाले आहेत.

उत्पल पर्रिकर यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. गोव्यातील जनता पाहते आहे की पर्रिकरांचा वारस किती हिमतीने पुढे जातो, असा सल्लाही उत्पल पर्रीकरांना राऊतांनी दिला आहे. भाजपला वाटले असेल गोव्यात घराणेशाहीला महत्व दिल्याने त्यांचे सरकार येईल. पण माझ्या मनात एकच प्रश्न आहे की मनोहर पर्रिकर यांच्या चिरंजीवांचे कर्तृत्व काय? मेरिट काय? असा प्रश्न विचारण्यात आला तर मग विश्वजीत राणे यांच्या पत्नीला तिकीट दिले तेव्हा हा प्रश्न लोकांनी विचारला की त्यांचे कर्तृत्व काय? निवडून येण्याची क्षमता हे उत्तर असेल तर पर्रिकर यांच्या चिरंजीवात निवडून येण्याची क्षमता नाही? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

उत्पल पर्रिकरांना इतर दोन मतदारसंघाचे पर्याय

पणजी मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्यात आले आहे. उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना आम्ही इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. पण दुसऱ्या पर्यायाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. मला असे वाटते की दुसऱ्या पर्यायाबद्दल ते सकारात्मक उत्तर देतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला मनोहर पर्रिकर यांच्याविषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असोत किंवा दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यात परिवारातील कोणताही सदस्य असो, ते सर्व जण आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणेच आहे. ते सर्व जण आमचे अगदी जवळचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वापरा आणि फेकून द्या हेच भाजपचे धोरण : केजरीवाल

दरम्यान, भाजपने वापरा आणि फेकून द्या या धोरणानुसार पर्रिकर कुटुंबीयांचा वापर केला, गोव्यातील लोकांनाही याचे दु:ख आहे. मी नेहमीच मनोहर पर्रिकर यांचा आदर करतो. उत्पल यांचे आम आदमी पक्षात स्वागत आहे, त्यांनी आपच्या तिकीटावर गोव्यातून निवडणूक लढवावी, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला ट्विट करत ही ऑफर दिलीय. या व्हीडिओमध्ये असे म्हटले आहे की, उत्पल यांचा पक्ष त्यांना त्यांच्या वडिलांचा मतदारसंघ असलेल्या पणजीतून निवडणूक लढवायला परवानगी देत नाही. यावर केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपचे पर्रिकर परिवाराबाबत ‘यूज एंड थ्रो’ धोरण आहे. मी नेहमी मनोहर पर्रिकर यांचा सन्मान केला. त्यामुळे आपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी उत्पल यांचे स्वागत आहे.’ मनोहर पर्रिकर यांचे २०१९ मध्ये निधन झाले. त्यानंतर गोव्याचे राजकारण बदलले आहे. विशेष म्हणजे भाजपने पणजी येथून वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले आहे. त्यांच्यावर २०१६ मध्ये एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

उत्पल काय म्हणतात?

भाजपने उमेदवारी नाकारली मात्र, आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे सांगतानाच अन्य पर्यायांना अर्थच नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी अवघ्या तीन ओळीतच आपली भूमिका मांडत मी पणजीवरच ठाम आहे. अन्य पर्यायांना काही अर्थच नाही. माझी भूमिका लवकरच माध्यमांसमोर मांडेल, असे म्हटले आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर हे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नाकीनऊ आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर उत्पल पर्रिकरांच्या नाराजीचा गोव्याच्या राजकारणावर परिणाम; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

भाजपने गोव्यात पहिली यादी जाहीर केली आहे. यात उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे पर्रिकर नाराज असून त्यांच्या नाराजीचे परिणाम संपूर्ण गोव्याला भोगावे लागतील, असा इशारा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. कारण, मनोहर पर्रिकर हे गोव्याने स्वीकारलेले नेतृत्व होते. जात-धर्माच्या पलिकडे लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले होते. अचानक त्यांच्या मुलाला उत्पल यांना शिस्तीच्या नावाखाली तिकिट नाकारल्यास त्याचा परिणाम गोव्याच्या राजकारणावर होईल, असे आव्हाड म्हणाले.

उत्पल पर्रीकरांना भाजपने ऑफर केलेल्या २ जागा कोणत्या?

पणजीतून लढण्यावर ठाम असलेल्या उत्पल यांनी भाजपच्या दोन जागांच्या ऑफर धुडकावून लावल्या आहेत. पण तरिही त्यांच्याशी पक्ष अजूनही चर्चा करत असल्याचं सांगितलं जातंय. अद्याप फायनल निर्णय झालेला नाही. मात्र सुरुवातीला ज्या दोन जागांची ऑफर भाजपं दिली होती, ती तर उत्पल यांनी नाकारली असल्याचं स्पष्ट झालं आहे. पणजीतून निवडणूक लढण्यावर उत्पल पर्रिकर का ठाम आहेत? भाजपनं उत्पल यांना दिलेल्या त्या दोन जागा नेमक्या कोणत्या होत्या? याबाबतही चर्चांना उधाण आलंय. नेमकी ऑफर न स्वीकारण्यामागची कारणं काय आहे, याबाबतही तर्कवितर्कांना उधाण आलंय.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आलेला आहे. अशातच गोव्यातील भाजपची पहिली यादीदेखील गुरुवारी जारी करण्यात आली आहे. भाजप उमेदवारांच्या यादीपेक्षा सध्या सगळ्यांचं लक्ष हे दिवंगत मनोहर पर्रिकरांच्या मुलांच्या राजकीय हालचालकींकंडे लागलेलं आहे. भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही देणार, यावरुन चर्चा जोरात रंगल्या आहेत. अशातच भाजपच्या दोन जागांचा पर्याय उत्पल पर्रिकर यांच्यासमोर ठेवला असल्याची माहिती समोर आली होती. या दोन जागा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या असल्याचंही खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय.

गोव्यातील स्थानिक खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पल पर्रिकर यांना उत्तर गोव्यातील एक आणि दक्षिण गोव्यातील एक अशा दोन जागांची ऑफर देण्यात आली होती. उत्तर गोव्यातील सांताक्रूझ आणि दक्षिण गोव्यातील मडगाव या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं त्यांच्यासमोर ठेवला होता. पण उत्पल पर्रिकर यांनी या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला. दरम्यान, आता त्यांना उत्तर गोव्यातील डिचोलीची ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता येऊ शकलेली नाही.

ऑफर केलेल्या दोन मतदारसंघाचा इतिहास

सांताक्रूझ हा गोव्याच्या उत्तर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. या मतदार संघामध्ये सहावेळा काँग्रेसची सत्ता होती. २०१७ मध्ये काँग्रेसच्या अँटोनियो फर्नांडिस यांनी विजय मिळवला होता. १९९४ साली या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार व्हिक्टोरीया फर्नांडिस रोमियो यांनी निवडणूक जिंकली होती. १९९९ मध्ये गोमंतक लोक पार्टीतून काँग्रेसमध्ये आलेल्या व्हिक्टोरीया यांनी सांताक्रूझमधूनच निवडणूक जिंकली होती. २००२ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर दुसऱ्यांना आमदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केला होता. तर २००७ सालीही त्यांनी पुन्हा ही किमया करुन दाखवली होती. सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघात २०१७ साली २७७११ इतके मतदार होते, ज्यापैकी २२२१५ जणांनी मतदान केलं होतं.

दक्षिण गोव्यातील मडगाव मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता आहे. अर्थात त्याआधी सलग तीन वेळा इथं भाजपची सत्ता होती. मडगावमध्ये २०१७ साली २८४५७ इतके मतदार होते. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत यांनी विजय मिळवला होता. १९९४ मध्ये मडगाव विधानसभा मतदारसंघातून दिगंबर कामत हे आमदार म्हणून निवडून आले होते. १९९९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. २००२ सालीही भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. तर २००७ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ही निवडणूक जिंकली देखील. २०१२ साली काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत पुन्हा एकदा जिंकून आले. भाजप उमेदवार रुपेश महात्मे यांचा त्यांनी ४४५२ मतांनी पराभव केला होता.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात स्पर्धेचं भय?

भाजपनं ऑफर केलेले दोन्ही मतदारसंघ हे खरंतर काँग्रेसचे गड मानले जातात. या मतदारसंघातून उत्पल यांना निवडून येण्याची शक्यता फारशी नाही. जरी या मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं, तरीदेखील फारसं सोप्प निश्चितच नसणार. या दोन्हीच्या तुलनेत पणजी हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. तसंच पणजी मतदारसंघात उत्पल यांनी आपल्या कामाला खूप आधीपासून सुरुवातही केली होती. अशावेळी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणं हे त्यांच्यासाठी तितकं सोप्प नसणार आहे.

पणजी मतदारसंघाचं महत्त्व

पणजी ही गोव्याची राजधानी. राजधानी पणजी हा गोव्याच्या राजकारणा अतिशय महत्त्वाचा असा उत्तर गोव्यातील मतदारसंघ. या मतदार संघावर भाजपचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं आहे. सातवेळा इथं भाजपनं आपली सत्ता राखली आहे. भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळईकर हे या मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. १९९४ साली पणजी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मनोहर पर्रिकरांनी निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होतीत. १९९९ मध्ये सलग दुसऱ्यांदा मनोहर पर्रिकरांनी पणजीत विजय मिळवला. मनोहर पर्रिकरांनी पणजीत हॅट्रिक मारली. तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी पणजीत भाजपचं वर्चस्व निर्माण केलं होतं. २००७ साली चौथ्यांदाही त्यांनी पणजीतून निवडणूक लढवून जिंकून दाखवली. २०१२ सालीही भाजपच्या उमेदवारीवर मनोहर पर्रीकरांनी निवडणूक जिंकली. पाच वेळा त्यांनी पणजीतून निवडणूक लढली आणि जिंकली.

दरम्यान, २०१५ साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या वतीनं सिद्धार्थ कुंकळईकरांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनीही पक्षानं सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडली होती. सध्या पणजीत बाबुश मॉन्सेरात हे आमदार असून सध्या ते भाजपात आहे. पणजी महानगरपालिकेतही बाबुश मॉन्सेरात यांचा मुलगा महापौर असून बाबुश यांची पत्नी प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्री आहेत. अशात बाबुश यांना डावलणे भाजपसाठी कठीण होते.

तृणमूलमुळे गोव्यातील समीकरणे बदलणार

तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो हे फातोर्डा मतदारसंघातून २०२२ची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. फालेरो यांना रिंगणात उतरविण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या निर्णयामुळे फातोर्डा मतदारसंघात विजय सरदेसाई यांच्याविरुद्ध फालेरो आणि दामू नाईक अशी तिरंगी, अटीतटीची लढत होणार आहे. ख्रिस्ती मतदार कोणत्या बाजूने राहतात, हे पाहणे आता जास्त कुतूहलाचे ठरेल.

फालेरो हे नावेलीचे माजी आमदार असले, तरी फातोर्डा मतदारसंघात त्यांचे वास्तव्य आहे. तसेच ते अजून मास लिडर आहेत. नावेलीसह मडगाव व फातोर्डातील लोक त्यांच्या संपर्कात आहेत. फातोर्डाचा मतदारसंघ हा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, गेल्या दशकभरापासून हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डकडे गेला आहे. आजपर्यंत फातोर्डात गोवा फॉरवर्ड पक्षाचे वर्चस्व टिकून आहे. पण तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लुईझिन फालेरो प्रथमच रिंगणात उतरतील. विजय सरदेसाई यांच्यासाठी हे आव्हान ठरेल. काँग्रेस-गोवा फॉरवर्डसाठी युतीसाठी ही नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

फातोर्डात बहुसंख्य काँग्रेसचे मतदार आहेत. याआधी झालेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे फातोर्डातून कमकुवत उमेदवार उभे केले गेले. यामुळे काँग्रेसचे पारंपरिक मतदार गोवा फॉरवर्डकडे वळले होते. आता लुईझिन फालेरो यांसारखे अनुभवी खासदार जर फातोर्डा मतदारसंघातून लढले तर मतदारसंघातील समीकरणे बदलतील. शिवाय काँग्रेस-फॉरवर्डची मते फुटतील, असे मानले जात आहे. ख्रिस्तीधर्मिय मतदारांची कसोटी लागणार आहे. २००२ व २००७ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत तिरंगी लढत झाल्याने भाजपचे उमेदवार दामोदर नाईक निवडून आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button