Top Newsराजकारण

सिद्धूंच्या नादात राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत : शिवराजसिंह चौहान

नवी दिल्ली – पंजाबमधील राजकीय घडामोडींवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत, असं म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी राहुल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे ते असेपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग चांगले मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं, असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. चौहान यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे.

पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. अमरिंदर सिंग चांगले मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही, असं चौहान यांनी म्हटलं आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एक ‘मिसगायडेड मिसाईल’ असल्याचं म्हणत बादल यांनी निशाणा साधला आहे. सिद्धू हे दिशाहीन मिसाईल असून त्यांना कुठे जायचंय हेच माहीत नाही, असं म्हटलं आहे. बादल यांनी चंदीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे.

मी आधीच सांगितले होते की नवज्योत सिंग सिद्धू हे एक दिशाहीन मिसाईल आहे, ज्याला माहीत नाही की ते कुठे जाईल किंवा कोणास मारेल. त्यांनी सर्वात आधी पंजाबकाँग्रेस अध्यक्ष बनून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नाश केला आणि आता त्यांच्या पक्षाचा नाश केला, असा शब्दांत बादल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच सिद्धूंनी पंजाब वाचवण्यासाठी मुंबईला निघून जावं. मी आधीच सिद्धूबद्दल इशारा दिला होता, सिद्धू अहंकारी माणूस आहे, हे पंजाबमधील प्रत्येक मुलाला हे माहीत आहे. त्यामुळे जर सिद्धूंना पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं, अशी मी त्यांना विनंती करतो, असा सणसणीत टोला देखील सुखबीर सिंग बादल यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button