दिवसभराच्या ११ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांची रात्री उशीरा पुन्हा ३ तास झाडाझडती
निवासस्थानी 'आयबी'ची पाळत; सीबीआयकडून महत्त्वाचे दस्तावेज, सीसी टीव्ही फुटेज ताब्यात
मुंबई/नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शनिवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली. यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या. नागपूर येथील जीपीओ चौकातील निवासस्थानी देशमुख यांची दिवसभरात ११ तास चौकशी केल्यानंतर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सीबीआयचे पथक परत देशमुख यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर सीबीआय पथकाने सायंकाळी ७ पासून रात्री १० वाजेपर्यंत देशमुख यांची पुन्हा ३ तास चौकशी केली. त्यानंतर सीबीआयचे पथक काही महत्त्वाचे दस्तावेज पिशवीतून घेऊन गेले. सीबीआय पथक गेल्यावर अनिल देशमुख परत बाहेर पडले व काटोल येथे नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या विलागीकरण केंद्राला भेट देण्यासाठी रवाना झाले.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्यानंतर काही दिवसांनी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा त्यांचा दावा आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने चौकशीला सुरूवात करून देशमुख यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास डीएल-२- एव्ही-८८९८ आणि एमएच-३१-डीझेड-९९९९ क्रमांकाच्या दोन कारमधून महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवासस्थानी धडकले. यात दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. देशमुख व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. सीबीआयच्या पथकाने तब्बल ११ तास निवासस्थानाची झाडाझडती घेतली. सीबीआयने काही दस्तऐवजही जप्त केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन केले. चार अधिकारी पीपीई किट घालून होते. सायंकाळी ६ च्या सुमारास सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवास्थानातून बाहेर निघाले होते.
सीबीआय चौकशीला संपूर्ण सहकार्य : देशमुख
त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना चौकशीत संपूर्ण सहकार्य करण्यात आले, असे देशमुख यांनी सांगितले. आता मी काटोल मतदार संघातील विलगीकरण केंद्राची पाहणी करण्यासाठी जात आहे, असे सांगून देशमुख निघाले.
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची याआधीही ११ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सीबीआयने शनिवारी देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले.
कोर्टाने सीबीआयला १०० कोटी वसुलींच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आयबीची पाळत
गत चार दिवसांपासून आयबीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर पाळत ठेवून होते. नागपुरातील सीबीआयचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली, अशी माहिती आहे. आगामी काही दिवस आयबीच्या अधिकाऱ्यांची जीपीओ चौकावर नजर असणार आहे, असे कळते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
सीबीआयने छापा टाकल्यानंतर दुपारी १ च्या सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी जीपीओ चौकात धडकले. त्यांनी सीबीआय, केंद्र सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सीताबर्डी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर तणाव निवळला. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जीपीओ चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.