Top Newsफोकस

अफगाणिस्तानवर अखेर तालिबानचा कब्जा; राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला

काबुल : तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या सर्वच प्रमुख शहरांवर कब्जा मिळविल्यानंतर अखेर राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तालिबानी बंडखोरांसमोर अफगाणिस्तान सरकारने गुडघे टेकले असून अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून ताजिकिस्तानचा आसरा घेतला आहे. राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचे तालिबानने जाहीर केले.

तालिबान्यांनी रविवारी सकाळीच काबुलला वेढा देत महत्त्वाची प्रवेशकेंद्रे ताब्यात घेतली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या सरकारने शरणागती पत्करली. अन्य महत्त्वाची शहरे तालिबान्यांनी आधीच ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासमोर फारसे पर्याय शिल्लक नव्हते. दुपारनंतर तालिबानी बंडखोरांनी काबुलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानच्या सेनेने पांढरे कपडे घालून शरणागती पत्करली. सत्ता परिवर्तन सुरळीतपणे पार पडल्यास हानी पोहोचविण्यात येणार नाही, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे.

तालिबानने दहा दिवसांत मजार-ए-शरीफ, जलालाबादचा ताबा घेतला. मजार-ए-शरीफ हे तालिबानविरोधी शहर मानले जाते. त्यानंतर जलालाबाद या शहराचा ताबा प्रतिकार न करता तालिबानला मिळाला. भारताने या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली नसून सध्या तेथे अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

तालिबानचा नेता मुल्ला बरादर याच्याशी बोलल्यावर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. अली अहमद जलाली याच्याकडे सत्ता सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाच्या विमानाच्या तासभर घिरट्या

काबुलमधून भारतीय दूतावासातील कर्मचारी व इतर नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान पाठविण्यात आले होते. मात्र, ते काबुलमध्ये दाखल होण्यापूर्वीच परिस्थिती बदलली. विमानतळावर एटीसीचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे विमान तब्बल एक तास काबुलच्या विमानतळाजवळ घिरट्या घालत होते. सुरक्षेसाठी वैमानिकांनी काही काळासाठी विमानाचे रडारही बंद केले होते. अखेर विमान उतरविण्यात आले. दूतावासातील सर्व कर्मचारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांना घेऊन विमान मायदेशी परतले.

दूतावासातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेने केले एअरलिफ्ट

तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करताच अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केले. त्यापूर्वी सर्व संवेदनशील माहिती डिलीट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघारी सुरू केल्यानंतर तालिबानने हळूहळू भूभाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी होईल, असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

कोण आहे मुल्ला बरादर

अखेर तालिबाननं जवळपास २० वर्षानंतर अफगाणिस्तानच्या सत्तेवर पूर्णपणे ताबा मिळवलाय. मुल्ला अब्दूल गनी बरादरचं नाव आता नवा राष्ट्रपती म्हणून जवळपास निश्चित मानलं जातंय. विशेष म्हणजे सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते ताजकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतात. मुल्ला अब्दूल गनी बरादर हा तालिबानच्या राजकीय विंगचा प्रमुख आहे. दोह्यात जी तालिबानसह आंतरराष्ट्रीय चर्चेच्या फेऱ्या झाल्यात त्यातही बरादरची महत्वाची भूमिका राहिलीय. मुल्ला ओमरसह तालिबानची स्थापना करण्याचं श्रेय हे बरादरकडे जातं.

तालिबानची ज्यावेळेस चर्चा होते, तेव्हा मुल्ला अब्दूल गनी बरादरचे नाव चर्चेत असतेच. बरादरचा जन्म आणि वाढ ही कंदहारची. याच कंदहारमध्ये तालिबानचाही जन्म झाला. १९७० ला सोव्हिएत यूनियननं अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली. त्या एका घटनेनं अफगाण लोकांच्या एका पिढीचं आयुष्य कायमचं बदललं. असं मानलं जातं की, त्या एका घटनेमुळे अफगाणिस्तानच्या प्रत्येक व्यक्तीवर कायमचा परिणाम झाला. त्यापैकीच एक आहे मुल्ला अब्दूल गनी बरादर. एका डोळ्यानं अधू असलेल्या मुल्ला ओमरसोबत खांद्याला खांदा लावून मुल्ला अब्दूल गनी बरादर लढल्याचं सांगितलं जातं. सोव्हिएत यूनियनं अफगाणिस्तानमधून माघार घेतली आणि यादवी माजली. त्याच अस्थिरता, गोंधळ, भ्रष्टाचाराच्या वातावरण मुल्ला ओमर आणि मुल्ला अब्दूल गनी बरादरनं तालिबानची स्थापना केली. २०१० साली मुल्ला अब्दूल गनी बरादरला पाकिस्तानच्या कराचीत अटक करण्यात आली होती आणि २०१८ मध्ये अमेरीकेच्या दबावानंतर त्याची सुटका केली गेली.

ज्या तालिबानसोबत चर्चा करुन डील करण्याचा प्रयत्न अशरफ गनी करत होते, त्याच तालिबानचा नेता मुल्ला अब्दूल गनी बरादर हा यापूर्वी तत्कालीन अफगाण राष्ट्रपती हमीद करजाई यांच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आले होता. अर्थातच तो प्रस्ताव किंवा तालिबानची कुठलीच गोष्ट त्यावेळेस मान्य केली गेली नाही. आता त्याच मुल्ला अब्दूल गनी बरादरकडे पळ काढलेल्या राष्ट्रपतींना डीलसाठी मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. पाकिस्ताननं मुल्ला अब्दूल गनी बरादरला आठ वर्ष जेलमध्ये ठेवलं. अमेरिकेनं दबाव आणून त्याला सोडवलं आणि कतारला पाठवलं. तिथं तालिबानच्या राजकीय शाखेचा प्रमुख म्हणून बरादरच्या नावाची घोषणा केली गेली. त्यानेच दोह्यात चर्चेच्या फेऱ्या पूर्ण केल्या. तालिबानला पुन्हा अफगाणिस्तानच्या सत्तेवर आणलं.

अशरफ गनीवर अफगाण जनता नाराज

सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे ताजिकिस्तानला पळून गेलेत. अमेरीकेनं त्यांची तशी सोय केल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे कालपर्यंत अशरफ गनी हे तालिबानचा पाडाव करण्याचं जनतेला टीव्हीवर आश्वासन देत होते. पण टीव्हीवर दाखवलेली त्यांची टेप ही आधीच रेकॉर्ड केली असल्याचं आता उघड झालंय. अफगाण जनतेला अशरफ गनी यांनी पळून जाणं फार रुचलेलं नाही. गनी यांनी अफगाण जनतेचा विश्वासघात केला आणि इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही अशा प्रतिक्रिया अफगाण जनता व्यक्त करत आहे. फक्त राष्ट्रपतीच नाही तर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीही देश सोडून निघून गेलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button