मेहुल चोक्सी अद्याप भारताचाच नागरिक; डॉमिनिका हायकोर्टात भारताची भूमिका
रोसेऊ: पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहे. डॉमिनिकाच्या तुरुंगातून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारने घुसखोर म्हणून जाहीर केल्यानंतर आता भारताकडून डॉमिनिका उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून, मेहुल चोक्सी अद्यापही भारताचा नागरिक असल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, भारतीय नागरिकत्व त्यागण्याची अर्ज भारताकडून नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तो आजही भारताचा नागरिक आहे. तसेच अँटिग्वा सरकारकडे मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याविषयीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मेहुल चोक्सीने फसवणूक करून अँटिग्वाचे नागरिकत्व घेतल्याचे भारताकडून निदर्शनास आणून देण्यात आले आहे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ च्या अन्वये मेहुल चोक्सीने भारताचे नागरिकत्व सोडल्याचा दावा त्रुटीपूर्ण आहे. त्याचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. भारताने अजूनही मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द केलेले नाही. त्यामुळे मेहुल चोक्सीचे सर्व दावे चुकीचे आहेत, असेही भारताकडून सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी, डॉमिनिका पोलिसांनी देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याबाबत मेहुल चोक्सीला २३ मे रोजी अटक केली होती. स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर मेहुल चोक्सीने डॉमिनिकाच्या उच्च न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, डॉमिनिका उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीने जामिनासाठी याचिका दाखल केली होती. तसेच मी कायद्याचे पालन करणारा व्यक्ती आहे. डोमिनिका सोडून कुठेही जाणार नाही. मी उपचारांसाठी भारत सोडला. भारताच्या तपास संस्थांपासून पळून आलेलो नाही, असे दावे करणारे प्रतिज्ञापत्र मेहुल चोक्सीने सादर केले होते. मात्र, डॉमिनिका सरकारने मेहुल चोक्सीला ‘विना परवानगी देशात प्रवेश केलेला अवैध प्रवासी’ म्हणून जाहीर केले आहे. तसेच मेहुल चोक्सीने केलेली याचिका वैध नसून, त्याला भारताकडे सोपवावे, अशी स्पष्ट भूमिका डोमिनिका सरकारने न्यायालयात मांडली आहे.