अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अदर पूनावालांचे साकडे; कच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा
पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी तसेच कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु केली आहे. आतापर्यंत ११ कोटीपेक्षा अधिक लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. वाढत्या लसींच्या मागणीमुळे देशात कोरोना लसींचा पुरवठा कमी पडत आहे. त्यातच आता अमेरिका-युरोपमधून येणारा कच्चा माल रोखण्यात आला आहे. हा माल रोखला असल्यामुळे लस निर्माण करणे अवघड झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना लसींची निर्मिती करणारे सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पूनावाला यांनी कच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती केली आहे.
कोरोना लसीच्या निर्मितीसाठी कच्चा मालाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. हा कच्चा माल अमेरिका, युरोपमधून मोठ्या प्रमाणात होतो. गेल्या काहिदिवसांपूर्वी अमेरिका आणि युरोपमधील येणाऱ्या कच्चा मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. असे अदर पूनावाला यांनी यापूर्वी सांगितले होते. तसेच आता आदर पूनावाला यांनी ट्विट करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कच्च्या मालावरील निर्यात बंदी उठवण्याची हात जोडून विनंती केली आहे. अदर पूनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आदरणीय जो बायडेन, कोरोना विषाणूविरोधातील लढाईत आपण खरच एकत्र असू तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्चा मालावरील निर्यात बंदी उठवा. जेणेकरुन लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. याबाबत तुमच्या प्रशासनाकडे अधिक सविस्तर माहिती आहे.