Top Newsअर्थ-उद्योग

मुंबई विमानतळावर अदानींचा बोर्ड; शिवसैनिकांचा तुफान राडा, तोडफोड

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली. अदानी कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला.

व्हीआयपी गेट नंबर ८ आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अदानी एअरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

अदानी समुहाने हवाई प्रवास क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठमोठ्या विमानतळांचे संचालन अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यातच मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचलनाची संपूर्ण जबाबदारी अदानी समुहाकडे सोपवण्यात आली होती. समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी ट्विट करुन याविषयी माहिती दिली होती.

गौतम अदानी यांचे ट्विट

जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही मुंबईला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याचे वचन देतो. व्यवसाय, आराम आणि मनोरंजनासाठी अदानी समूह भविष्यातील विमानतळ परिसंस्था तयार करेल. आम्ही हजारो नवीन स्थानिक रोजगार निर्माण करू, असे आश्वासन गौतम अदानी यांनी दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button