अर्थ-उद्योगराजकारण

अदानी समुहाची सेबी, डीआरआयकडून चौकशी सुरू; सरकारकडून राज्यसभेत माहिती

नवी दिल्लीः अदानी समुहाबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि सेबी अदानी समुहाच्या काही कंपन्यांची चौकशी करत आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री यांनी सभागृहात दिली. ही चौकशी सेबीच्या नियमनासंबंधित आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. दुपारी २.११ वाजता अदानी पोर्ट २.४५ टक्क्यांनी खाली आला. अदानी ग्रीन एनर्जी ३.५३ टक्क्यांनी खाली आली, अदानी एंटरप्रायजेस ३ टक्क्यांनी घसरले, अदानी ट्रान्समिशन १.७५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेलीय, अदानी टोटल गॅस ५ टक्क्यांनी खाली आलाय आणि अदानी पॉवरमध्ये ३.५५ टक्क्यांनी घट नोंदवली गेलीय.

अलीकडेच मोदी सरकारने मंत्रिमंडळात कठोर बदल केले होते. आता भागवत किशन राव आणि पंकज चौधरी यांना अर्थ राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आलीय. पूर्वी ही जबाबदारी अनुराग ठाकूर यांच्याकडे होती. अनुराग ठाकूर यांना क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. अर्थ राज्यमंत्री यांनी सभागृहात सांगितले की, सध्या सेबी आणि डीआरआय एकत्र अदानी समूहाच्या काही कंपन्यांची चौकशी करत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणताही तपास केला जात नाही.

जून महिन्यात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) तीन एफपीआयची खाती गोठविलीत. या तीन फंडांमध्ये अदानी ग्रुपचे ४३५०० कोटींचे शेअर्स आहेत. ही बातमी आल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एनएसडीएलने केलेली कारवाई ही मनी लॉन्ड्रिंगशी निगडित असल्याचे दिसून आले. तीनही फंड मॉरिशस आधारित आहेत आणि सेबीकडे नोंदणीकृत आहेत. अहवालानुसार तिन्ही कंपन्यांचा पत्ता एकसारखा आहे. मॉरिशसची राजधानी असलेल्या पत्त्यात पोर्ट लुईस शहराचे नाव नोंदविले गेलेय. याशिवाय या तिन्ही कंपन्यांची वेबसाईट नाही.

या तीन फंडांनी अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये भरीव गुंतवणूक केली आहे. तिन्ही कंपन्यांनी मिळून अदानी एंटरप्रायझेसमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमधील ५.९२ टक्के आणि अदानी ग्रीनमधील ३.५८ टक्के भागभांडवल आहेत. अदानी ग्रुपच्या सहा कंपन्या बाजारात सूचीबद्ध आहेत. या सहा कंपन्या आहेत – अदानी एंटरप्राईजेस, अदानी पोर्ट आणि सेझ, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी.

त्या अहवालात असेही सांगितले गेले होते की, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये हेरगिरी केली जात आहे. या संदर्भात सेबीही चौकशी करत आहे. मागील वर्षी ही तपासणी सुरू झाली आणि आजपर्यंत सुरू आहे. अदानी समूहाच्या सहा कंपन्यांनी गेल्या एका वर्षात २००-१०० टक्के परतावा दिला. अदानी ट्रान्समिशन ६६९ टक्के, अदानी टोटल गॅस ३४९ टक्के, अदानी एंटरप्राईजेस ९७२ टक्के, अदानी ग्रीन गॅस २५४ टक्के, अदानी पोर्ट १४७ टक्के आणि अदानी पॉवर २९५ टक्क्यांनी वाढ झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button