नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांपासून ते आमदारापर्यंत ईडी आणि आयकर विभागाने कारवाई केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर कारवाई करण्यात आली, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच, अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग गेले कुठे? असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची आठवण काढली. तसंच एकनाथ खडसे, संजय राऊत, हसन मुश्रीफ, अजित पवार व त्याची बहीण या सर्व लोकांवर झालेल्या केंद्रीय संस्थेच्या कारवाईवर टीका केली.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले म्हणून त्यांच्या पत्नीवर आरोप झाले. शिवसेनेचे खासदार यांच्या पत्नीवर आरोप केले. अजित पवार यांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर आरोप केले, त्यांच्या घरी २०-२० अधिकारी घरी येऊन बसले. मी त्या अधिकाऱ्यांना विचारले तुम्हा का पाच पाच दिवस घरी बसून आहेत, तर ते म्हणाले की दिल्लीवरून आदेश आहे, असंही पवारांनी सांगितलं.
अनिल देशमुख यांनी वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे. अनिल देशमुख यांचा दोष नसताना त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना अटक झाली आणि आता आरोप करणारे परमवीर सिंग आहेत कुठे? असा सवालही पवारांनी केला. काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुउपयोग करत आहे. काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायची असतात. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली, पाय जमिनीवर नाही, त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही, असं म्हणत पवारांनी भाजपवर घणाघात केला. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे असते, काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली व सुडाचे राजकारण सुरू केले. मात्र आमचे कार्यकर्ते अशा लोकांना व्याजासह अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा पवारांनी दिला.