आरोग्य

अबॉटची न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडियाशी (एनएसआय)भागीदारी

मुंबई : मेटॅबॉलिक सिंड्रोम आणि त्याच्याशी संबंधित पोट व आतड्यांच्या अर्थात गॅस्ट्रोइंटेस्टिनल (जीआय) समस्या देशात मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागल्या असून ३३.५ टक्‍के भारतीयांना या आजारांचा त्रास आहे. या सिंड्रोममुळे टाइप २ डायबेटिस आणि हृदयविकारासारख्या गुंतागुंतींचा धोका वाढतो.[2] गॅस्ट्रोइंटेस्टिनल आजारांच्या विस्तृत आवाक्यात येणा-या आजारांच्या व्यवस्थापनामध्ये आहार आणि जीवनशैली या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात, मात्र त्यांच्याकडे बरेचदा दुर्लक्ष होते. भारतामध्ये जीवनशैलीशी निगडित दुर्धर आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेता गॅस्ट्रोइंटेस्टिनल समस्यांच्या व्यवस्थापनासाठीआहार आणि जीवनशैलीतील बदलांवर भर देणा-या अशा एका सर्वांगिण दृष्टिकोनाची गरज आहे ज्यांच्यामुळे आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या उद्भवण्याचा काळ लांबू शकेल, किंवा या आजारांचा प्रतिबंध होऊ शकेल.

ही गरज लक्षात घेऊनच, सततच्या बद्धकोष्ठतेपासून ते पेप्टिक अल्सर, लठ्ठपणा, क्रॉनिक पँक्रियाटायटिस आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारख्या जीआयसमस्यांना सामो-याजात असलेल्या रुग्णांमध्ये पहिल्यावहिल्या भारतविशिष्ट क्लिनिकल आहारविषयक शिफारशीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अबॉटने न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया (एनएसआय)बरोबर भागीदारी केली आहे. या शिफारशी स्थानिक पातळीवर सुलभतेने वापरता येण्याजोग्या आहेत व एखाद्या व्यक्तीला गाठायचे असलेले आदर्श वजन, पोषणविषयक गरजा, नेहमीची स्वयंपाकाची पद्धत आणि इतर संबंधित घटकांनुसार या शिफारशींमध्ये आवश्यक ते फेरफार करता येण्यासारखे आहे. आजच्या काळात, मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्क्युलर विकारांसारख्या आनुषंगिक आजारांना प्रतिबंध करण्याची व त्यांचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे बनले असताना, विशेषत: अलीकडच्या महिन्यांमध्ये भारतात असंसर्गजन्य आजारांच्या देखभालीमध्ये व्यत्यय येत असताना या शिफारशी प्रकाशित झाल्या आहेत.[3]

अबॉट इंडियाच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. श्रीरुपा दास म्हणाल्या,“पोषक आहार आणि जीवनशैलीतील बदल ही पोटाच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. आपल्या देशामध्ये भिन्नभिन्न प्रकारच्या खानपान संस्कृती अस्तित्त्वात असल्यामुळे एकाच प्रकारचा डाएटरी प्लॅन अर्थात आहारनियोजन सर्व रुग्णांना चालेलच असे नाही. शिवाय अशा आहारनियोजनाच्या नियमांचे पालन सातत्याने करत राहणे हे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर खास भारतीयांच्या आहारपद्धतीबरहुकूम तयार करण्यात आलेल्या, विविध अन्नसंस्कृतींमधील खाण्याच्या सवयींनुसार बदलता येण्याजोग्या पहिल्यावहिल्या शिफारशी आणि सूचना प्रसिद्ध करण्यासाठी अबॉटने न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडियाशी हातमिळवणी केली आहे. या शिफारशींमध्ये या वेगवेगळ्या आहारपद्धतींचा विचार करण्यात आल्याने त्यातून रुग्णांना त्यांच्या विशिष्ट आहारानुसार सल्ला मिळू शकेल. त्यामुळे या सूचनांचे अधिक चांगल्याप्रकारे पालन केले जाऊ शकेल व आरोग्यात सुधारणा होऊन भारतातील मेटॅबॉलिक सिंड्रोमचा धोका असलेल्या व्यक्ती अधिक समृद्ध आणि निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने आपल्या जीवनशैलीत दूरगामी बदल घडवून आणू शकतील.”

शाह सुपरस्‍पेशालिटी क्लिनिक येथील गॅस्‍ट्रोएण्‍टरोलॉजिस्‍ट आणि सैफी अॅण्‍ड वॉकहार्ड्ट हॉस्पिटल्‍स येथील कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. हार्दिक शाह म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये मेटॅबॉलिक सिंड्रोमग्रस्क रुग्णांचे प्रमाण ४० टक्‍के[4] इतके आहे. उपचारांच्या जोडीला शारीरिक व्यायाम आणि आहारपद्धतीत बदल यांसारख्या जीवनशैलीतील सुधारणा अंमलात आणल्यास गॅस्ट्रोइन्टेस्टिनल समस्यांच्या व्यवस्थापनास मदत होऊ शकेल. या आहारविषयक शिफारशी सर्वंकष उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापन योजनेच्या सहाय्याने देशभरातील आरोग्यकर्मींच्या प्रयत्नांना हातभार लावू शकतील.”

पोटाच्या आरोग्यासाठी प्रयत्न करताना सांगितलेल्या डाएटचे नियमित पालन करणे महत्त्वाचे आहे असे सांगत सर विठ्ठलदास ठाकरसी कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त) एसएनडीटीडब्‍ल्‍यूयू,मुंबईचे प्राचार्य, प्राध्यापक, न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य आणि इंडियन डायबेटिक असोसिएशनचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जगमीत मदन म्हणाल्या, “संस्कृती-विशिष्ट आहारविषयक शिफारशींच्या अभावी रुग्णांना जागतिक पातळीवर वापरल्या जाणा-या आहारनियोजनपद्धतींची शिफारस केली जाऊ शकते. अशा आहारनियोजनाचा फायदा केवळ २५ टक्‍के रुग्णांनाच होतो.[5] त्याऐवजी खास भारतीय आहारपद्धती विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या या आहारविषयक शिफारशींमुळे डाएट प्लॅनचे प्रदार्घ काळासाठी पालन करण्यास मदत होऊ शकेल. आहारपद्धती अशाप्रकारे पाळली गेल्याने शरीराला न मानवणारे अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाण कमी होईल. हेच पदार्थ आजार बळावण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे, अशा शिफारशींच्या सहाय्याने आहारतज्ज्ञ आपल्या रुग्णांना परिणामकारक, पर्सनलाइझ्ड डाएट प्लॅन पुरवू शकतील, जो रुग्णांच्या आवडीच्‍या आहारपद्धतीनुसार आखलेला असेल व त्यांच्या पोट व आतड्यांचे आरोग्य जपण्यास मदत करू शकेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button