देवानाना नागपूरकर सकाळी सकाळी आरशासमोर उभे राहून दाढी घोटत आहेत. आरशातल्या आपल्या गोड गुबगुबीत छबीकडे पाहत ‘ दुष्मन की देखो कैसी वाट लावली.’ गुणगुणत आहेत. उधोजराजेंच्या टीमची दुसरीही विकेट काढल्यामुळे आणि तिसरी विकेट कशी काढायची याचा प्लॅन तयार असल्याचा कोल्हापूरकर दादांचा फोन थोडयाच वेळापूर्वी आल्यामुळे स्वारी खुशीत आहे. ‘आता लवकरच तिसरी विकेट आणि जमलं तर महिन्या दोन महिन्यांत आख्खी टीमच तंबूत !’ अशा स्वप्नरंजनात देवानाना मशगुल असतांनाच त्यांच्या सौभाग्यवती हातात मोबाईल घेऊन येतात आणि स्पीकरवर हात ठेवत उधोजीराजेंचा फोन असल्याची वर्दी देतात. उधोजीराजेंचा फोन आहे हे ऐकल्याबरोबर देवानानांची कळी खुलते.
देवानाना – ( खुश होत,सौभाग्यवतींना) बघ, सांगितलं होतं ना तुला , जातो कुठे बच्चमजी ? येईल एक दिवस माझ्याच जवळ, बघ आला तो दिवस. ( हातात फोन घेत, उघडपणे) हॅलो .
उधोजीराजे – हॅलो , ओळखलं का ?
देवानाना – (हळूच) ते तर दीड वर्षांपूर्वीच ओळखलं होतं .
उधोजीराजे – काय ?
देवानाना – नाही. नाही. तुम्हाला नाही.हिच्याशी बोलत होतो जरा. बोला , कशी आठवण आली बुवा बहुमतवाल्यांना अल्पमतवाल्यांची? कोणी मिठाचा खडा टाकला की, कोणी टेकू काढून घेतला ?
उधोजीराजे – ( न ऐकल्यासारखं करत ) त्याचं असं आहे , एक प्लॅन आहे मनात, पण त्याच्यासाठी तुमची मदत लागणार आहे. तुम्ही सहकार्य करालच याची खात्री आहे. किंबहुना तशी खात्री असल्यामुळेच तर प्लॅन तयार केला आहे.
देवानाना -( उतावीळपणे ) हो. हो. नक्कीच. सांगा ना काय प्लॅन आहे ?
उधोजीराजे – त्याचं काय आहे की आता सगळंच आटोक्याच्या बाहेर चाललं आहे. आता ही चेन तोडायलाच हवी .अजून किती बळी जाऊ देणार, नाही ? मी तर म्हणतो की,एकदा का ही चेन तोडण्यात आपल्याला यश आलं की, बळी आपोआपच थांबतील. काय वाटतं तुम्हाला ? आहात ना पाठीशी ? म्हणजे तुमचा पाठिंबा आहे असं गृहीत धरून उचलू ना पाऊल , चेन तोडण्यासाठी ?
देवानाना – (खुश होत) अरे व्वा ! तुम्ही पाठिंबा मागाल आणि मी देणार नाही , असं कुठे होईल का ? जुने संबंध असतात , ते विसरून कसं चालेल ? आणि चेन तोडायचं आणि बळी थांबवायचं म्हणाल ,तर चेन तुटली की बळी आपोआपच थांबतील . तुम्ही फक्त चेन तोडायची हिंमत दाखवा . अशी तोडून टाकू की परत कधी तयारच होणार नाही.
उधोजीराजे – मला वाटलंच होतं की तुम्ही हो म्हणाल म्हणून . किंबहुना तशी खात्रीच होती मला . आणि का असू नये तुमच्याबद्दल खात्री ? असायलाच हवी आणि होतीच ती . मी तर तुमचा पाठिंबा गृहीत धरून पाऊल उचलणार होतो , पण म्हटलं एकदा तुमच्याशी बोलून, तुम्ही पाठीशी असल्याची खात्री करून घ्यावी.
देवानाना – कशाला लाजवता उगीच ? आपण का परके आहोत का एकमेकांसाठी ? तुम्ही मला न विचारता जरी निर्णय घेतला असता ना तरी रात्र पहाट काही न पाहता माझा पाठिंबा राहिलाच असता तुम्हाला.
उधोजीराजे – नाही नाही. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय एवढं मोठं पाऊल कसं उचलणार ? ऐनवेळेस तुम्ही साथ नाही दिली म्हणजे मी तोंडावर पडणार . त्यापेक्षा जे करायचं ते तुमची संमती घेऊनच करायचं असंच ठरवलं होतं मी.
देवानाना – ( अतिशय हर्षभरीत आवाजात ) कोणता मुहूर्त काढायचा मग ?
उधोजीराजे – तुमचा पाठिंबा आहेच हे तर पक्कंच आहे . आता असं करतो , सकाळीच फेसबुक लाईव्ह करून डिक्लियर करून टाकतो .
देवानाना – (गोंधळून ) फेसबुक लाईव्हवर काय डिक्लियर करणार आहात ?
उधोजीराजे – ( निरागसपणे ) ३० एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन !