Top Newsफोकस

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू; १० कामगार गंभीर जखमी

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या स्लॅबच्या जाळ्यांमध्ये अडकून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर १० कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांना ढिगाऱ्याखालून काढून प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. ही घटना रात्री उशिरा येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली आहे. या दुर्घटनेत तळमजल्यावरील कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

शास्त्रीनगर चौक, वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु होते. रात्री ११ च्या दरम्यान हा सांगाडा अचानक कोसळला. त्याखाली तेथे काम करीत असलेल्या जवळपास १० कामगार खाली दबले गेले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर करुन हा सांगाडा कापला व त्यानंतर खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथून १० कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दुर्घटनेबाबत ट्विट करून घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केले.

महापालिकेच्या जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला. यात गंभीर अवस्थेतील काही जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. यावेळी जवानांनी एका मागोमाग एक सात कामगारांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या दुर्घटनेने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दुर्घटना घडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली गेली नव्हती, असे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button