पाकिस्तानच्या ग्वादर शहरात बॉम्बस्फोट, ८ चिनी अभियंत्यांचा मृत्यू
ग्वादर : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर शहरात आज मोठा बॉम्बस्फोट झाला. यात आठ चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटामागे तालिबानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. याच बरोबर, हा हल्ला बलुच फायटर्सने केल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानात चिनी अभियंत्यांना लक्ष्य करणारा हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी अप्पर कोहिस्तान जिल्ह्यातील दासू भागात चिनी अभियंत्यांवर हल्ला झाला होता. यात ज्या बसमध्ये ते बसले होते त्या बसलाच निशाणा बनविण्यात आले होते. या हल्ल्यात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. यात ९ चिनी नागरिकांचा समावेश होता.
या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि चीन यांच्या संबंधांत तणाव निर्माण झाला होता. यावेळी पाकिस्तानने सर्वप्रथम तांत्रिक बिघाडामुळे बसमध्ये स्फोट झाल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर भारतावर आरोप करायला सुरुवात केली. यासंदर्भात बोलताना, आपण प्रकरणाची चौकशी करू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते. मात्र, चीनने त्यांच्या शब्दांवर विश्वास न ठेवता स्वतःची टीम तपासासाठी पाठवली. यानंतर, चीनने पाकिस्तानला इशारा देत, प्रकल्पांशी संबंधित आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करा, असे सांगितले होते. मात्र, या हल्ल्यामुळे पाकिस्तान असे करण्यात अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे.