पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. आता अशीच एक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं आहे. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झालं आहे.
२०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.
काही दिवसांपूर्वी २०१३ पासून टीईटीच्या मार्फत भरती झालेल्या राज्यातील सर्व शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत की नाही याची पडताळणी करायचं शिक्षण परिषदेने ठरवलं होतं. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, महापालिकाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांना तसे आदेश देण्यात आले. पुणे सायबर पोलिस सध्या २०१८ आणि २०२० मधे झालेल्या टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत.
आकडेवारी वाढण्याची भीती
दरम्यान, येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी मोठा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या तपासातून आणखी मोठे आकडे समोर येण्याचीही दाट शक्यता आहे. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याप्रकरमी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून ही आता रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.
पुणे पोलीस टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसै घेणाऱ्या दलालांच्या शोधात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील एजंटांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पोलीस तपासात अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत.