राज्यात म्युकोरमायकोसिसचे ५२ बळी; इंजेक्शनचा मोठा तुटवडा
मुंबई : कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस फंगल इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. दुर्मिळ आणि गंभीर बुरशीजन्य ब्लॅक फंगस (Mucormycosis) या आजाराने आतापर्यंत राज्यात तब्बल ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८ रूग्णांच्या डोळ्यांची दृष्टी गेली असल्याने त्यांना अंधत्व आले आहे.
आरोग्य विभागाने प्रथमच काळ्या बुरशी या आजराने मृत झालेल्या लोकांची यादी तयार केली आहे. ज्यामध्ये हा आकडा समोर आला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर या सर्व ५२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. देशात गेल्या वर्षी महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू होता मात्र काळ्या बुरशीमुळे मोजक्या लोकांचा मृत्यू झाला होता. पण यावर्षी त्या संख्येत वाढ झाली असून तब्बल ५२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने असेही सांगितले की, काळ्या बुरशीच्या आजाराने त्रस्त झालेल्या ८ रुग्णांना एका डोळ्याने दिसणं बंद झाले असून त्यांची नजर गेली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, राज्यात काळ्या बुरशीचे साधारण २ हजार रुग्ण आढळले आहेत. राज्यातील काळ्या बुरशीच्या आजाराने ग्रासलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी एक लाख अॅम्फोटेरिसिन-बी अँटी-फंगल इंजेक्शन खरेदी करण्यासाठी निविदा तयार करण्यात येणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रूग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर रोगांनी ग्रस्त रूग्णांना या आजाराचा बळी पडण्याची शक्यता जास्त असते, अशीही माहिती राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. अशा रूग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकारने १८ वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर उपचार करण्यासाठी बर्याच विषयांमध्ये तज्ज्ञ असलेल्या तज्ज्ञांची आवश्यकता असते कारण ही बुरशीजन्य संसर्ग नाक, डोळ्याद्वारे पसरतो आणि मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.
इंजेक्शनचा तुटवडा
कोरोनावरवर प्रभावी ठरणाऱ्या रेमेडिसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी ज्याप्रकारे लोकांची वणवण सुरू आहे. त्याप्रकारे काळ्या बुरशीच्या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी Liposomal amphotericine B हे इंजेक्शन प्रभावी ठरत असून बाजारात त्याचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. देशातील बऱ्याच राज्यात या इंजेक्शनची मोठी मागणी असून तेथे या इंडेक्शनची मोठी कमतरता भासत आहे.