Top Newsफोकस

जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह ५ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. गेल्या १२ तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये चार तर बडगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती या सुरूच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बडगाममधील तिलसर, चरार-ए-शरीफ येथे रात्री १० वाजता सीआरपीएफ आणि पोलिसांनी शोध सुरू करताच, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर जवानांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. चकमकीत तीन दहशतवादी लपल्याचीही माहिती मिळाली होती. मध्यरात्रीनंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. त्याच्याकडून एके-५६ रायफलही जप्त करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. घटनास्थळावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं होतं. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या रेझिस्टन्स फ्रंटचे होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या किलबाल भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button